काल्याचाही होऊ शकतो ‘अक्कू’
By Admin | Updated: December 3, 2014 00:35 IST2014-12-03T00:35:32+5:302014-12-03T00:35:32+5:30
छेडखानी आणि विनयभंग करणारा कुख्यात राजेश खडसे ऊर्फ काल्या यालासुद्धा ‘अक्कू’जवळ पाठवण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाच-सहावेळा आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी

काल्याचाही होऊ शकतो ‘अक्कू’
बांगलादेश वस्तीत दहशत : छेडखानीमुळे महिलांमध्ये आक्रोश
नागपूर : छेडखानी आणि विनयभंग करणारा कुख्यात राजेश खडसे ऊर्फ काल्या यालासुद्धा ‘अक्कू’जवळ पाठवण्यासाठी महिलांनी कंबर कसली आहे. पाच-सहावेळा आपला जीव वाचवून पळून जाण्यात यशस्वी ठरलेल्या काल्याला आता एकही संधी न देण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे. काल्याच्या दहशतीत जगणाऱ्या पाचपावली येथील चंद्रभागानगरातील महिला आणि तरुणी रात्र जागून काढीत आहेत. मेयो रुग्णालयात भरती असलेला काल्या केव्हा घरी परततो, याची त्या वाट पाहत आहेत.
सूत्रानुसार काल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी जगतात आहे. त्याच्याविरुद्ध मारहाण, तोडफोड, चोरी, छेडखानीसह ३० पेक्षा अधिक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पाचपावली ठाण्यांतर्गत येणाऱ्या नाईक तलावाला लागून बांगलादेश वस्ती आहे. याच वस्तीतील चंद्रभागानगरात काल्या राहतो. तो महिलांची व तरुणींची छेडखानी करण्यासाठी कुख्यात आहे. त्यामुळेच त्याची वस्तीत दहशत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने वस्तीत जुगाराचा क्लब चालवणाऱ्या मामाकडून हप्ता वसुली केली होती. जुगार अड्डा चालवणाऱ्या मामाने लोकांच्या मदतीने काल्याला चांगलाच चोप दिला होता. गंभीर जखमी झालेल्या काल्याला अद्दल घडवण्याचे वस्तीतील नागरिकांनीही निश्चित केले होते. परंतु काल्या नेहमीच शस्त्र घेऊन असतो. त्यामुळे त्याच्यासमोर जाण्याची कुणाची हिंमत झाली नाही. संतापलेल्या महिला काल्याचा अक्कू करण्याची शक्यता लक्षात घेऊन पाचपावली पोलिसांनी काल्याला बांगलादेश वस्तीतून हाकलून दिले आहे. त्यानंतर तो कळमन्यातील पारडी येथे निघून गेला. तिथेसुद्धा तो हप्ता वसुली आणि मारहाण करू लागला. काही दिवसांपूर्वी काल्याचा पारडीतील सचिन वासनिकसोबत वाद झाला होता. तेव्हापासून सचिन त्याला संपविण्याच्या तयारीला लागला. सचिनला अद्दल घडवण्याच्या तयारीत असलेल्या काल्याने पारडीतील एका तरुणाला चाकूने वार करून जखमी केले. पोलिसांनी त्याला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली होती. महिनाभरापूर्वीच काल्या जामिनावर सुटून आला होता. याची माहिती मिळताच जखमी तरुणाच्या परिचितांनी काल्याच्या घरावर हल्ला केला. काल्या हाती न लागल्याने त्याचे घर पेटवून दिले.
पारडीत आपला खुन होण्याची शक्यता लक्षात घेऊन काल्या १५ दिवसांपूर्वीच पारडी सोडून बांग्लादेश वस्तीत परत आला. तेव्हापासून वस्तीमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. बांगलादेश वस्तीतील एक कुटुंब कॅटरिंगच्या व्यवसायाशी संबंधित आहे. गेल्या आठवडाभरापासून काल्या या कुटुंबाला धमकावित आहे. तुरुंगातून सुटून येण्याचा खर्च ४० हजार रुपये झाल्याने तो खर्च या परिवाराला मागत आहे. २८ नोव्हेंबर रोजी त्याने कॅटरिंग व्यावसायिकेची मावशी व मुलीला मारहाण सुद्धा केली. मुलीला आपल्या सोबत बळजबरीने नेण्याचा प्रयत्नही केला. परंतु वस्तीतील लोकं धावले. त्यांनी काल्याला घेरले आणि लाठ्या काठ्यासह जे हातात येईल त्याने त्याची धुलाई केली. दरम्यान काल्याची पत्नी मदतीसाठी धावली. तिने आपल्या पतीला सोडण्याची विनंती केली. तिला पाहून महिलांचा राग शांत झाला. काल्याला सोडून महिला आपापल्या घरी निघून गेल्या. जखमी काल्यावर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे. (प्रतिनिधी)