गुन्हा दाखल : चर्चित तूरडाळ चोरी प्रकरण नागपूर : कळमना येथील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध (एएसआय) लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश ठाकूर असे आरोपी एएसआयचे नाव आहे. तक्रारकर्ता वाशीम येथील मुन्ना वावाचा भंगार व्यापारी आहे. मुन्ना हा चर्चित तूरडाळ चोरी प्रकरणात सहभागी होता. त्याने न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविला होता. मुन्नाच्या तक्रारीनुसार त्याच्या जामिनावर पोलिसांची बाजू ठेवण्यासाठी ठाकूरने त्याला तीन लाख रुपयाची मागणी केली होती. चर्चेनंतर दोन लाख रुपये देण्याचे ठरले. २ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(एसीबी)कडे तक्रार आली तेव्हा त्यांनी चौकशी केली. ३ मार्च रोजी मुन्ना पैसे घेऊन कळमना ठाण्यात आला. ठाकूरने तेव्हा त्याला सुनावले आणि बाहेर पाठविले. बुधवारी सकाळी एसीबीने ठाकूरच्या विरुद्ध लाच मागण्याचा गुन्हा दाखल केला. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. तिथे काहीही सापडले नाही. ठाकूरही सापडला नाही. कळमना पोलीस तीन महिन्यांपासून तूरडाळ चोरी प्रकरणाचा तपास करीत आहेत. उद्योजक अशोक गोयल यांनी मागविलेली आयातीत तूरडाळ ट्रक चालक मुंबई ते नागपूरदरम्यान ढाबा मालकांना विकत होते. आतापर्यंतच्या तपासादरम्यान एक डझनभर आरोपींना अटक करण्यात आली आहे. या चौकशीमुळे अनेक जण दुखावले गेले आहेत. त्यामुळेसुद्धा एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास निरीक्षक भावना धुमाळे आणि मोनाली चौधरी करीत आहेत.(प्रतिनिधी)
कळमन्याचा पोलीस उपनिरीक्षक राजेश ठाकूर एसीबीच्या जाळ््यात
By admin | Updated: March 10, 2016 03:32 IST