कळंबीची जि.प. शाळा झाली स्मार्ट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:13 IST2021-02-06T04:13:12+5:302021-02-06T04:13:12+5:30
विजय नागपुरे कळमेश्वर : जिल्हा परिषदेच्या शाळाही आता खासगी शाळांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. खालावलेली पटसंख्या वाढविण्यासोबतच शालेय परिसर सुशोभित ...

कळंबीची जि.प. शाळा झाली स्मार्ट!
विजय नागपुरे
कळमेश्वर : जिल्हा परिषदेच्या शाळाही आता खासगी शाळांच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. खालावलेली पटसंख्या वाढविण्यासोबतच शालेय परिसर सुशोभित करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. लोकसहभागातून असाच लूक बदलला आहे कळंबी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा. कळंबी येथील जिल्हा परिषद शाळेत वर्ग १ ते ७ मध्ये एकूण ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या शासन निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्ग ५ ते ७ मध्ये ३३ विद्यार्थी सध्या शाळेत ज्ञानार्जन घेत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी चार शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मागील मार्च महिन्यापासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या आहेत. परंतु या दहा महिन्याच्या कालावधीत या गावातील नागरिकांनी एकत्र येत शाळेचा परिसर सुशोभित करण्यासाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे. जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे ओसाड रखरखीत परिसर, जीर्ण इमारती असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु शिक्षक, ग्रामपंचायत प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद शाळांचे स्वरूप पालटू लागल्याचे चित्र आता तालुक्यात बघावयास मिळत आहे.
लोकसहभागातून झालेल्या वर्गणीतून शाळेच्या इमारती तसेच कम्पाऊंड वॉल पेंटिंग करून परिसर बोलका करण्यात आला आहे. याकरिता सरपंच रश्मी मोहोड, उपसरपंच विनोद भोयर, मुख्याध्यापक श्रीकांत साबळकर, सहायक शिक्षक कैलास राऊत, अरविंद श्रीखंडे, खेमराज डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य प्रिया धोतरकर, किरण टिकले, ताराबाई भांगे, उषाताई चिमोटे, आकाश घटे, सविता घोडमारे आदींनी परिश्रम घेतले.
असा केला बदल
शाळेच्या भिंतीवर विद्यार्थी कसा असावा, छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान भेट, एबीसीडी, योगा, १ ते १० पाढे, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले, नेहमी बोलण्यात येणारे इंग्रजी शब्द, व्यसनमुक्ती विचार, भौमितिक आकृत्या, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आदी विषयांबाबत चित्र रेखाटल्या गेली आहेत. विद्यार्थी वर्गातच नाही तर शालेय परिसरात खेळत असतानासुद्धा आपल्या ज्ञानात भर पडून घेत आहेत. तसेच शाळा परिसरात क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्या माध्यमातून शाळकरी मुलामुलींना शिक्षणाचे महत्त्व तसेच त्यांच्यामध्ये शिक्षणविषयक प्रेरणा निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे.