काकाची हत्या, जन्मठेप कायम

By Admin | Updated: September 5, 2014 01:09 IST2014-09-05T01:09:56+5:302014-09-05T01:09:56+5:30

क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणादरम्यान काकाची हत्या करणाऱ्या पुतण्याची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे.

Kaka's murder, life imprisonment continued | काकाची हत्या, जन्मठेप कायम

काकाची हत्या, जन्मठेप कायम

हायकोर्ट : अमरावती जिल्ह्यातील घटना
नागपूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणादरम्यान काकाची हत्या करणाऱ्या पुतण्याची जन्मठेप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे.
सुनील झोलबा मडावी असे आरोपीचे नाव असून तो वासड, ता. धामणगाव रेल्वे येथील रहिवासी आहे. मृताचे नाव श्रावण मडावी होते. अमरावती सत्र न्यायालयाने ४ आॅक्टोबर २०११ रोजी आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप ठोठावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
ही घटना १३ आॅगस्ट २०१० रोजी घडली होती. आरोपीचे एका व्यक्तीसोबत भांडण झाले होते. मृताचा मुलगा मनोहर भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला. दरम्यान, आरोपीने संबंधित व्यक्तीला सोडून मनोहरलाच मारहाण करायला सुरुवात केली.
यामुळे मनोहर घरी पळून लपला. यानंतर आरोपी विळा घेऊन तेथे पोहोचला. आरोपीचा आवाज ऐकून श्रावण घराबाहेर आला. दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने श्रावणची पोटात विळा भोसकून हत्या केली. श्रावणचा २१ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेचे दोन प्रत्यक्ष साक्षीदार होते. तसेच, श्रावणने मृत्यूपूर्व बयानात घटना सांगितली होती. शासनातर्फे एपीपी नहुष खुबाळकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)

Web Title: Kaka's murder, life imprisonment continued