कबाडी व्यावसायिकाची दिवसाढवळ््या हत्या
By Admin | Updated: February 8, 2015 01:17 IST2015-02-08T01:17:40+5:302015-02-08T01:17:40+5:30
उत्तर नागपुरात कबाडी व्यवसाय करणाऱ्या तरुणाला वर्धा मार्गावर बोलावून त्याची त्याच्या मैत्रिणीसमोर चार ते पाच जणांनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी तरुणाची

कबाडी व्यावसायिकाची दिवसाढवळ््या हत्या
मैत्रिणीचे अपहरण : स्कॉर्पिओसुद्धा पळविली
नागपूर : उत्तर नागपुरात कबाडी व्यवसाय करणाऱ्या तरुणाला वर्धा मार्गावर बोलावून त्याची त्याच्या मैत्रिणीसमोर चार ते पाच जणांनी निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी तरुणाची स्कॉर्पिओ घेऊन पळताना त्याच्या मैत्रिणीचेही अपहरण केले. दीड तासानंतर तिला उत्तर नागपुरात सोडून दिले. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्याकांडामुळे शहरात खळबळ निर्माण झाली आहे.
गोलू ऊर्फ विनोद मुरलीधर ठाकूर (वय २७) असे मृताचे नाव आहे. तो यशोधरानगरातील कांजी हाऊस चौकाजवळ राहात होता. त्याची मैत्रिण वैशालीनगर गार्डनजवळ राहाते. आज दुपारी ३.३० च्या सुमारास विनोद ठाकूर तिच्यासोबत फिरत असताना त्याच्या मोबाईलवर फोन आला. त्यामुळे विनोद आपल्या स्कॉर्पिओने (एमएच ४०/ ए ४३४३) मैत्रिणीसह वर्धा रोडवरील खापरी चौकात पोहचला. महेश ढाब्याजवळ त्याने आपले वाहन उभे केले. लगेच तेथे पंकज, इग्गू आणि अन्य काही विनोदजवळ आले. सर्वच जण ओळखीचे असल्यामुळे मैत्रिण कारमध्येच बसली तर, आरोपी विनोदला सोबत बाजूच्या कबाडी दुकानाजवळ गेले. तेथे बराच वेळ ते बोलत होते. कंटाळलेल्या मैत्रिणीने विनोदला आवाज देऊन ‘चलो निकलते’ म्हटल्यामुळे तो कारजवळ आला. त्याच्यापाठोपाठ एक आरोपी आला आणि विनोदच्या कंबरेत हात घालून त्याला बाजूला नेले. तेवढ्यातच एकाने विनोदच्या डोक्यावर सब्बल (रॉड) मारला. त्यामुळे विनोद हल्ला करणाऱ्याकडे वळला. त्याचवेळी इतरांनी त्याला पकडून ठेवले आणि एकाने त्याच्यावर रॉडचे वार करीत त्याला जमिनीवर लोळविले.
मैत्रिणीचा आक्रोश अन् मूकदर्शक जमाव
विनोदवर जीवघेणा हल्ला होत असल्याचे पाहून मैत्रिणीने मदतीसाठी आरडाओरड केली. मारेकऱ्यांना हात जोडून विनवण्याही करू लागली. दिवसाढवळ्या भर रस्त्यावर घडलेल्या या घटनेला अनेकांनी बघितले. मात्र, कुणीही हल्लेखोरांना रोखण्याची हिंमत दाखवली नाही. जमाव मूकदर्शक बनून उभा राहिला. विनोद गतप्राण झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी तिला विनोदच्या स्कॉपिओत कोंबले. यानंतर आरोपी सुमारे दीड तास विविध मार्गाने फिरत यशोधरानगरातील विटभट्टी चौकात पोहचले. या दरम्यान त्यांनी पारुलची संपूर्ण माहिती घेतली. ज्या रॉडने हत्या केली तो तिच्या हातात पकडवून ‘तुझ्या हाताचे ठसे, यावर उमटले. तू आमच्या विरोधात पोलिसांना काही सांगितले तर तुलाही आरोपी व्हावे लागेल’, अशी भीती दाखवत तिला कारखाली उतरवले. तिला एका आॅटोत बसवून घरी जाण्यास सांगितले.
मैत्रिण पोहचली ठाण्यात
आरोपी पळून गेल्यानंतर जमावातील एकाने १०० क्रमांकावर फोन करून माहिती दिली. सोनेगाव ठाण्यात दुपारी ४.२५ ला हत्येची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी विनोदचा मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. दरम्यान, आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर पारुल आपल्या पालकांसह सोनेगाव ठाण्यात पोहचली. तिने पोलिसांना आरोपींची नावे आणि घटनाक्रम सांगितला.