बोलले तसे वागा
By Admin | Updated: December 1, 2014 00:54 IST2014-12-01T00:54:42+5:302014-12-01T00:54:42+5:30
शेतमालाचे भाव आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्या यासंदर्भात देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ते विरोधी पक्षात असताना ज्या घोषणा केल्या होत्या त्या त्यांनी आता सत्ता आल्यावर पूर्ण कराव्यात.

बोलले तसे वागा
ठिय्या आंदोलन : शेतकरी नेत्यांचे आवाहन
नागपूर : शेतमालाचे भाव आणि शेतकऱ्यांच्या इतर समस्या यासंदर्भात देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ते विरोधी पक्षात असताना ज्या घोषणा केल्या होत्या त्या त्यांनी आता सत्ता आल्यावर पूर्ण कराव्यात. या नेत्यांनी बोलल्याप्रमाणे वागावे, असे आवाहन शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी रविवारी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात रविवारी शेतकरी संघटनेने नागपुरात ठिय्या आंदोलन केले. ठरल्यानुसार हे आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थानापुढे होणार होते. पण पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. तरीही हजारो शेतकरी या आंदोलनासाठी नागपुरात दाखल झाले होते.
संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे जात असताना, त्यांना अमरावती मार्गावरील वाणिज्य महाविद्यालयाजवळ रोखण्यात आले. तेथेच नंतर जाहीर सभा झाली. या सभेत संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेत्यांची भाषणे झाली. त्यांच्या भाषणाचा सूर हा भाजप नेत्यांना त्यांच्या निवडणुकीच्या काळातील घोषणांची आठवण करून देणाराच होता.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल, धानाला तीन हजार रुपये व सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा, यासाठी आंदोलन केले होते. विधानसभेतही ही भूमिका मांडली होती; सोबतच कर्जमुक्ती व वीज बिलमुक्तीचीही भूमिका मांडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या काळात उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून शेतमालाचे भाव ठरविले जातील, असे अभिवचन देशाच्या जनतेला व शेतकऱ्यांना दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ही भूमिका विरोधी पक्षात असताना विधानसभेत आणि सभागृहाबाहेर मांडली होती. आता तेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या अभिवचनाची पूर्तता करावी, असे या नेत्यांचे म्हणणे होते. शेतकरी संघटनेचे नेते व माजी आमदार वामनराव चटप म्हणाले की, आम्हाला वेगळे काहीही नको, फडणवीस यांनी त्यांच्या घोषणांची पूर्तता करावी, शेतमालाच्या संदर्भात जे ते बोलले होते तेच त्यांनी आता मुख्यमंत्री म्हणून करावे. याप्रसंगी आमदार सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, दिनेश शर्मा, संजय कोल्हे, शैला देशपांडे, अनिल धनवंत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे डॉ. श्रीनिवास खांदेवाले, पी.के.बी. चक्रवर्ती, अॅड. नंदा पराते आदींची भाषणे झाली. सभेचे संचालन राम नेवले यांनी केले.
स्वतंत्र विदर्भाचाही नारा
शेतकरी संघटनेच्या या आंदोलनात ‘जय जवान जय किसान’सोबतच ‘जय विदर्भ’च्याही घोषणा देण्यात आल्या. आंदोलन शेतकऱ्यांचे की विदर्भवाद्यांचे, अशी चर्चाही यावेळी होती.
अटक आणि सुटका
वाणिज्य महाविद्यालयाजवळ शेतकऱ्यांचा मोर्चा अडविण्यात आल्यावर याच ठिकाणी शरद जोशी, वामनराव चटप, राम नेवले आदींसह हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी तांत्रीक अटक करुन काही वेळांनी सुटका ेकेली़सायंकाळी ७ वाजेपर्यंत स्थानबद्ध करण्याचे आदेश होते. परंतु एकूणच आंदोलन हे शांततेत पार पडल्याने सायंकाळी ४ वाजता आंदोलकांना सोडण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.
दरम्यान, रविवारी सकाळपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गिरीपेठ येथील शेतकरी संघटनेच्या कार्यालयात एकत्र जमले. यात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. आदिवासी विकास भवन, आरटीओमार्गे हा मोर्चा लॉ कॉलेज चौकाच्या दिशेने निघाला. परंतु पोलिसांनी चौकापूर्वीच तो अडविला. त्यामुळे या ठिकाणीच शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.
मुख्यमंत्री निवासस्थान, परिसराला पोलिसांचा वेढा
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धरमपेठ येथील निवासस्थान आणि परिसराकडे जाणाऱ्या सर्व मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर पोलिसांचा पहारा होता. निवासस्थानाकडे जाणारे सर्व छोटे-मोठे रस्ते कठडे लावून बंद करण्यात आले होते. निवासस्थानीही पोलिसांचा कडेकोट बंदबस्त होता. चौकाचौकात साध्या पोशाखातील पोलीस लक्ष ठेवून होते. त्यामुळे एकाही आंदोलकाला तिकडे फिरकताही आले नाही. (प्रतिनिधी)