खासगी हॉस्पिटल तपासणीचे केवळ सोंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:07 AM2021-05-08T04:07:49+5:302021-05-08T04:07:49+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये सामान्य रुग्णांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवून बेड नसल्याचे कारण पुढे करीत गंभीर ...

Just disguise a private hospital checkup! | खासगी हॉस्पिटल तपासणीचे केवळ सोंग!

खासगी हॉस्पिटल तपासणीचे केवळ सोंग!

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये सामान्य रुग्णांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) ठेवून बेड नसल्याचे कारण पुढे करीत गंभीर रुग्णांची अडवणूक करायची नंतर तोच बेड खासगी दरात उपलब्ध करून देण्याचे प्रकार वाढल्याने महानगरपालिकेने मेडिकलच्या मदतीने खासगी हॉस्पिटल तपासणीची मोहीम हाती घेतली. पाच हॉस्पिटलची तपासणी केल्यावर संत जगनाडे चौकातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. परंतु महिना होऊनही दोषी हॉस्पिटलवर कारवाईच झाली नाही. आता पुन्हा मनपा मेडिकलवर दबाव आणून इतर खासगी हॉस्पिटलची तपासणी करून देण्याची मागणी केली जात आहे. परंतु कारवाईच होत नसल्याने तपासणीचे हे सोंग कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित व मृत्यूच्या संख्येची विक्रमी नोंद झाली. मात्र, मागील पाच दिवसांपासून कोरोनाची संख्या पाच हजारावर स्थिरावली आहे. परंतु खासगी रुग्णालयात रुग्णांना सहज बेड मिळणे अद्यापही कठीणच आहे. गुरुवारी शहर व ग्रामीण मिळून ६४ हजार ५९७ कोरोनाचे रुग्ण होते. यातील ५१ हजार ५६९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर उर्वरित १३ हजार २८ मधील २,३६५ रुग्ण विविध शासकीय रुग्णालयात तर सुमारे १० हजार रुग्ण खासगी रुग्णालयात भरती आहेत. सध्याच्या स्थितीत खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचे २७६५, आयसीयूचे १७४४ तर व्हेंटिलेटरचे ३५३ बेड आहेत. शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचे २७६५, आयसीयूचे ५२३ तर व्हेंटिलेटरचे २२७ बेड आहेत. शासकीय व खासगी मिळून शुक्रवारी सकाळपर्यंत १०३८ ऑक्सिजनचे, १११ बेड आयसीयूचे तर केवळ २ बेड व्हेंटिलेटरचे रिकामे होते. शासकीय रुग्णालयात आयसीयूचा एकही बेड उपलब्ध नव्हता. मनपा प्रशासनाकडून आयसीयूचे बेड रिकामे दाखविले जात असताना प्रत्यक्षात मात्र रुग्णांना बेड नसल्याचे सांगून अडवणुकीचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी आहेत.

-पथकाला पाचमधून एका रुग्णालयात दोष आढळून आले

खासगी रुग्णालयातील हे प्रकार समोर आणण्यासाठी मनपाने मेडिकलच्या मदतीने खासगी हॉस्पिटलमधील आयसीयूची तपासणी करण्याची ४ एप्रिलपासून मोहीम हाती घेतली. शहरातील पाच मोठ्या खासगी हॉस्पिटलची तपासणी केली. यात संत जगनाडे चौक येथील येथील हॉस्पिटलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. ‘को-मॉर्बिडिटीज’ नसताना व शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९४च्यावर असतानाही अशा रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवले होते. या संदर्भाचा अहवाल मेडिकलच्या चमूने मनपाला दिला परंतु कारवाई झाली नाही.

-कारवाई होत नसल्याने मेडिकलने दिला नकार

मनपाने आता पुन्हा इतर खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी मेडिकलकडे डॉक्टरांचे पथक मागितले आहे. परंतु मागील तपासणीत एक खासगी हॉस्पिटल दोषी आढळूनही कारवाई झाली नसल्याचे कारण पुढे करीत, मेडिकलच्या मेडिसीन विभागाने तपासणीस नकार दिल्याचे समजते.

-दोषी रुग्णालयावर कारवाई निश्चितच होईल

एक महिन्यापूर्वी खासगी हॉस्पिटलमधील आयसीयू बेडवरील रुग्णाची तपासणी करण्याची मोहीम मनपा व मेडिकलने हाती घेतली. त्यानंतर या मोहिमेचा अहवाल अद्यापही मला प्राप्त झालेला नाही. परंतु यात कुठलेही खासगी हॉस्पिटल दोषी आढळून आले असल्यास त्यावर निश्चितच कारवाई होईल.

-जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनपा

Web Title: Just disguise a private hospital checkup!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.