ज्वेलर्स श्रीमांकर खुनातील सूत्रधार १५ वर्षांपासून फरारच

By Admin | Updated: July 10, 2015 02:49 IST2015-07-10T02:49:37+5:302015-07-10T02:49:37+5:30

सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकातील कुमार ज्वेलर्सचे मालक कृष्णकुमार गोवर्धनदास श्रीमांकर यांचा परप्रांतीय ...

Jupiter Shrimankar murder suspect has been absconding for over 15 years | ज्वेलर्स श्रीमांकर खुनातील सूत्रधार १५ वर्षांपासून फरारच

ज्वेलर्स श्रीमांकर खुनातील सूत्रधार १५ वर्षांपासून फरारच

नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील दारोडकर चौकातील कुमार ज्वेलर्सचे मालक कृष्णकुमार गोवर्धनदास श्रीमांकर यांचा परप्रांतीय लुटारूंनी खून करून लाखोचा ऐवज लुटण्याच्या घटनेला १५ वर्षांचा काळ लोटला. दोन मुख्य सूत्रधार जामिनावर सुटून फरार झाले. त्यानंतर उर्वरित केवळ दोघांवर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात खटला चालून त्यांचीही सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. एका ज्वेलर्सचे सांडलेले रक्त व्यर्थ ठरले.
साजीत शेख बशीर (४३) आणि राजू ऊर्फ शमीम सलीम खान अशी फरार आरोपींची नावे असून, ते मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील रहिवासी आहेत. खटला चाललेल्या दोन जणांपैकी रशीद खान आणि विवेककुमार ताम्रकार यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आरोपींपैकी रशीदखान हा मारेकऱ्यांपैकी असून ताम्रकार हा लुटीचा माल विकत घेणारा आहे.
सरकार पक्षानुसार घडलेली घटना अशी, २५ फेब्रुवारी २००० रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास कृष्णकुमार श्रीमांकर यांनी आपले दुकान उघडले होते. घरूनच त्यांनी सोने व चांदीचे दागिने एका रेग्झिन बॅगमधून आणले होते. हे दागिने दुकानाच्या काऊंटरमध्ये ठेवले होते. अचानक सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास साजित शेख, शमीम खान आणि रशीद खान, असे तिघे लुटण्याच्या हेतूने दुकानात शिरले होते. त्यांनी सोने व चांदीचे दागिने लुटल्यानंतर ज्वेलर्स श्रीमांकर यांनी तिघांचाही मोठा प्रतिकार केला होता. लुटारूंनी त्यांच्यावर चाकूने वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवले होते. काऊंटरच्या मागच्या भागात ते पडलेले होते.
लुटारूंनी १८ किलो चांदी, सोन्याची एक अंगठी आणि तीन हजार रुपये रोख, असा ऐवज लुटून नेला होता. श्रीमांकर यांच्या दुकानातील नोकर कुलदीप उपाध्याय याला श्रीमांकर हे रक्ताच्या थारोळ्यात आढळून येताच त्याने त्यांच्या घरच्या लोकांना कळवले होते. लागलीच त्यांची मुलगी मेघना आणि इतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. नितीश रमेशचंद्र श्रीमांकर यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. वैद्यकीय अहवालावरून ३०२, ३४ आणि त्यानंतर भादंविच्या ३९२, ४११ कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी तपास करून चारही आरोपींना अटक केली होती.
आरोपी रशीद खान आणि इतरांनी खुनाची आणि लुटीची कबुली दिली होती. वितळवलेल्या अवस्थेतील सोने व चांदी जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. साजीत आणि शमीम खान यांना जामीन मिळून ते फरार झाले होते. पुढे ते पोलिसांना गवसलेच नाहीत. त्यामुळे खटला रशीद खान आणि विवेककुमार यांच्याविरुद्ध चालला. फरार आरोपींना वेगळे करण्यात आले. अटक झाल्यानंतर त्यांच्यावर स्वतंत्र खटला चालणार आहे.
या खटल्यात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. आरोपींच्या कबुलीजबाबाचा पंच साक्षीदार कुलदीप उपाध्याय हा होस्टाईल झाला होता. दुर्दैवाने सरकार पक्ष आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे न्यायालयाने दोन्ही आरोपींना संशयाचा लाभ देऊन त्यांची निर्दोष सुटका केली. (प्रतिनिधी)

Web Title: Jupiter Shrimankar murder suspect has been absconding for over 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.