स्मारकाच्या स्वच्छतेसाठी तरुणाई सरसावली
By Admin | Updated: December 3, 2014 00:37 IST2014-12-03T00:37:18+5:302014-12-03T00:37:18+5:30
देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराज बाग चौकातील भव्य स्मारकाची दूरवस्था झाली असल्याची बातमी लोकमतने प्रसारित केली होती.

स्मारकाच्या स्वच्छतेसाठी तरुणाई सरसावली
तीन तास चालले स्वच्छता अभियान : संघटनांचाही पुढाकार
नागपूर : देशाचे पहिले कृषिमंत्री आणि शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांच्या महाराज बाग चौकातील भव्य स्मारकाची दूरवस्था झाली असल्याची बातमी लोकमतने प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने स्मारकाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन, स्मारकाचा संपूर्ण परिसर मंगळवारी स्वच्छ केला. तीन तास हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिकेनेही बातमीची दखल घेऊन, पाच वर्षापासून दूर्लक्षित असलेल्या स्मारकाला भेट दिली.
कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या सुंदर परिसराची महापालिकेच्या दुर्लक्षामुळे वाताहत झाली होती. हा परिसर असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनला होता. येथील बाग पूर्णत: नष्ट झाली होती. फुलझाडांऐवजी सर्वत्र गवत उगवले होते. कोरीव काम करण्यात आलेल्या दगांमध्ये झाडे उगवली होती.
बसण्याच्या बाकांच्या जागेवर कचराघर बनले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून याकडे महापालिकेने लक्ष न दिल्याने शहरातील अतिशय सुंदर असलेले हे ठिकाण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. याकडे लोकमतने लक्ष वेधल्यानंतर विविध संघटनांनी स्मारकाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहकार्याने स्मारक परिसरातली झाडे, गवत, पडलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यात आला. महापालिकेच्या सहकार्याने स्मारकाचा परिसर पाण्याने स्वच्छ करण्यात आला. या कार्यात अॅग्रोव्हेट-अॅग्रो इंजिनिअर मित्र परिवाराचे अध्यक्ष दिलीप मोहितकर, सचिव प्रणय पराते भूषण खडसे, अजय तायवाडे, लक्ष्मीकांत पडोळे, डॉ. सहानपुरे, देवेंद्र मते यांच्यासह आपचे देवेंद्र वानखेडे यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)