कनिष्ठ महाविद्यालयांनी परस्पर सुरू केले अकरावीचे प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:38+5:302021-05-23T04:07:38+5:30
नागपूर : दररवर्षी अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते. राज्यात कोरोना संसर्गाचे वादळ घोंगावत असल्यामुळे सुरक्षेचा उपाय ...

कनिष्ठ महाविद्यालयांनी परस्पर सुरू केले अकरावीचे प्रवेश
नागपूर : दररवर्षी अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होते. राज्यात कोरोना संसर्गाचे वादळ घोंगावत असल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून शासनाने दहावीची परीक्षा रद्द करून दिलासा दिला. असे असले तरी शिक्षण संचालनालयातर्फे अजूनही अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत निर्णय झालेला नाही. पण दुसरीकडे काही कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावीचे प्रवेश परस्पर सुरू केले आहे. अशातच उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याबाबत शासनावर ताशेरे ओढल्याने पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे दहावीचा भूगोलचा पेपर रद्द केला होता. यंदाही मार्च महिन्यात कोरोनाची संख्या वाढू लागल्याने सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्याच धर्तीवर राज्याच्या शिक्षण विभागाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले. त्यामुळे दहावीच्या परीक्षेबाबत संभ्रम आहे.
पण काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी २०२१-२२ या सत्रातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातून अर्ज मागविणे सुरू केले असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सहा महानगर क्षेत्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने करण्यात येतात. उर्वरीत महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर प्रवेश केले जातात. संचालनालयाने स्पष्ट केले की अकरावीच्या प्रवेशाची कार्यपद्धती अजूनही अंतिम करण्यात आलेली नाही.
- विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना
शिक्षण संचालनालयाने शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना केल्या की, अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश, शासन आदेश प्राप्त झाल्यानंतरच कळविण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया आपल्या स्तरावर सुरू करू नये. विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होईल, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जावू नये.