पेंचमधील ‘जंगल सफारी’ कुणासाठी?
By Admin | Updated: March 6, 2017 01:54 IST2017-03-06T01:54:34+5:302017-03-06T01:54:34+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे.

पेंचमधील ‘जंगल सफारी’ कुणासाठी?
खासगी वाहनांना प्रवेश बंदी का? : पर्यटकांचा सवाल, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी अफलातून निर्णय
जीवन रामावत नागपूर
पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने अलीकडेच जंगल सफरीसाठी जंगलात जाणाऱ्या खासगी वाहनांना प्रवेश बंदी करून केवळ जिप्सीची सक्ती केली आहे. वन विभागाच्या या निर्णयावर अखेर ‘जंगल सफारी’ कुणासाठी सामान्य पर्यटकांसाठी की, जिप्सीवाल्यांचे खिसे भरण्यासाठी, असा प्रश्न सामान्य पर्यटक उपस्थित करू लागला आहे. माहिती सूत्रानुसार पेंच येथील यापूर्वीचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षकांनी हा अफलातून निर्णय घेतला होता. या निर्णयाने ‘जंगल सफारी’ ही सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर झाली आहे. विशेष म्हणजे, वन विभागाने मागील काही वर्षांत आपला खजिना भरण्याच्या हव्यासापोटी जंगल सफारीच्या प्रवेश शुल्कात सुद्धा मनमानी वाढ केली आहे. यातच आता खासगी वाहनांवर प्रवेश बंदी घातल्याने गरीब आणि सामान्य पर्यटन हा जंगल सफारीपासून वंचित राहत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला असता, येथे जंगल सफारीसाठी सिल्लारी, कोलितमारा, चोरबाहुली, खुबाळा, खुर्सापार व सुरेवानी असे सात गेट तयार करण्यात आले आहेत. यापैकी शिल्लारी गेटवरून दररोज (सकाळ-संध्याकाळ) ८० वाहनांना प्रवेश दिला जातो, तसेच कोलितमारा गेटवरून २०, चोरबाहुली गेटवरून ४८, खुबाळा येथून १६, खुर्सापार येथून ३२ आणि सुरेवानी येथून १४ वाहने आत सोडली जातात. यासाठी वन विभागाने निश्चित केलेल्या शुल्कानुसार प्रत्येक पर्यटकाकडून ८० रुपये प्रवेश शुल्क, ३०० रुपये गाईड आणि खासगी जीप-कारसाठी ४४० रुपये आणि मिनी बससाठी ८८० रुपये शुल्क आकारले जात होते. यानुसार एक कुटुंब दोन ते अडीच हजार रुपयांत संपूर्ण जंगल सफारीचा आनंद लुटू शकत होते, परंतु आता जिप्सीची सक्ती केल्याने केवळ जिप्सीच्या भाड्यापोटी त्याला दोन हजार रुपये मोजावे लागतात. या व्यतिरिक्त प्रवेश शुल्क आणि गाईड शुल्क वेगळे द्यावे लागते.
अशाप्रकारे एका कुटुंबाचा खर्च हा साधारण साडे तीन ते चार हजार रुपयांपर्यंत जात, असून तो गरीब आणि सामान्य पर्यटकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.
पर्यटकांनी फिरविली पाठ
पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या या निर्णयाविरुद्ध पर्यटक तीव्र रोष व्यक्त करीत असून, अनेकांनी जंगल सफारीकडे पाठ फिरविली आहे. मागील दोन वर्षांपूर्वी पेंच आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जंगल सफारीसाठी पर्यटकांच्या रांगा लागत होत्या. परंतु आता या दोन्ही ठिकाणी पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जंगल ओसाड पडले आहे. कधी काळी आॅनलाईन बुकिंग हाऊसफुल राहणाऱ्या या दोन्ही जंगलाकडे आता पर्यटक फिरकायलासुद्धा तयार नाही. याचा अप्रत्यक्ष वन विभागाला फटका सहन करावा लागत आहे. शिवाय त्याचवेळी पर्यटकांकडून खासगी वाहनांवरील प्रवेश बंदी हटविण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यांच्या या मागणीची पेंचचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन दखल घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.