मुलासह आईची तलावात उडी
By Admin | Updated: July 23, 2015 02:49 IST2015-07-23T02:49:29+5:302015-07-23T02:49:29+5:30
एका महिलेने आपल्या दुधपित्या मुलासह अंबाझरी तलावात उडी घेतली. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

मुलासह आईची तलावात उडी
अंबाझरी तलावातील घटना : आईचा मृतदेह सापडला नाही
नागपूर : एका महिलेने आपल्या दुधपित्या मुलासह अंबाझरी तलावात उडी घेतली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. चिमुकल्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. अंबाझरी पोलीस रात्री उशिरापर्यंत महिला व मुलाची ओळख पटविण्याच्या कामात गुंतले होते. परंतु ओळख पटविता आली नाही.
बुधवारी सकाळी ११ वाजता एक महिला मुलाला कडेवर घेऊन अंबाझरी ओव्हर फ्लोच्या पायऱ्यांवर चढली आणि तलावाच्या काठावर आली. त्यावेळी आकाशात ढग दाटून आले होते. तलावाच्या काठावर अनेक लोक बसले होते. अचानक महिलेने मुलासह तलावात उडी घेतली. नागरिकांनी आरडाओरड केली. लगेच पोलिसांना सूचना दिली. अंबाझरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस.व्ही. त्रिपाठी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाला सूचना दिली. तलावात पोहणाऱ्या स्थानिक नागरिकांनाही बोलावण्यात आले. अग्निशमन दलाच्या बोटीने तलावात महिला व मुलाचा शोध घेण्यात आला. दुपारी २.३० च्या दरम्यान मुलाचा मृतदेह हाती आला. चिमुकला दीड ते दोन वर्षाचा होता. मुलाने काळ्या रंगाचे ठिपके असलेला पांढरी टी शर्ट आणि निळ्या रंगाचे फुलं असलेला पांढरा पायजामा घातला होता. मुलाच्या दोन्ही हातावर पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे मोती असलेले लॉकेट बांधले होते. अंबाझरी पोलिसांनी सर्व ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. बेपत्ता झालेल्या लोकांचे फोटो सुद्धा तपासून पाहिले जात आहे. महिलेचा मृतदेह हाती लागलेला नाही तसेच ओळखही पटविता आली नाही. (प्रतिनिधी)