न्यायमंदिर इमारत ‘अंडर सर्व्हिलन्स’
By Admin | Updated: April 1, 2017 03:04 IST2017-04-01T03:04:29+5:302017-04-01T03:04:29+5:30
संपूर्ण न्यायमंदिर इमारत आता ‘ अंडर सर्व्हिलन्स’ मध्ये आली असून आत आणि सभोवताल ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.

न्यायमंदिर इमारत ‘अंडर सर्व्हिलन्स’
राज्यातील पहिलेच जिल्हा न्यायालय : ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले
राहुल अवसरे नागपूर
संपूर्ण न्यायमंदिर इमारत आता ‘ अंडर सर्व्हिलन्स’ मध्ये आली असून आत आणि सभोवताल ६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. सीसीटीव्ही नेटवर्कने सुसज्ज करण्यात आलेले राज्यातील हे पहिलेच जिल्हा न्यायालय आहे.
न्यायमंदिर इमारतीमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याने सुरक्षेचा प्रश्न भेडसावत होता. आजवर जिल्हा न्यायालयात घडलेल्या घटना जगाचे लक्ष वेधणाऱ्या ठरल्या आहेत. जरीपटका कस्तुरबानगर येथील कुख्यात गुंड अक्कू यादव याची न्यायालय कक्षात महिला व पुरुषांच्या जमावाकडून हत्या, हातकडीतील कुख्यात समशेरवर हल्ला करणाऱ्या कुख्यात राजू रजवाडे हा फौजदाराच्या गोळीबारात ठार, कुख्यात अनिल पौनीपगार याच्यावरील न्यायाधीशाच्या कक्षात खुनी हल्ला, हातकडीतील आणि स्टेनगनधारी पोलीस एस्कॉर्टमधील पिंटू शिर्के याची न्यायमंदिराच्या सहाव्या मजल्यावर कुख्यात विजय मते, राजू भद्रे आणि साथीदारांकडून हत्या, ट्रेझरी बाररूममध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, सीताबर्डी टोळीयुद्धातील गुंडांची न्यायालय कक्षात चकमक, अॅड. श्रीकांत खंडाळकर यांचा संशयास्पद मृत्यू, अशा घटना घडल्या आहेत.
जिल्हा बार असोसिएशनकडून जिल्हा न्यायालय सुरक्षेसाठी स्थायी स्वरूपाची पोलीस चौकी, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली जात होती. त्यापैकी पोलीस चौकी उभारून पुरेसे पोलीस बळही तैनात करण्यात आले.
मेटल डिटेक्टर बसविण्यात आले. परंतु निधीअभावी बऱ्याच काळापासून सीसीटीव्हीचे काम रेंगाळले होते. सीसीटीव्हीची आग्रही मागणी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जयस्वाल आणि सचिव नितीन तेलगोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करून सतत पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी ६८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली.
कोर्ट मॅनेजर संजय सिंग यांच्या देखरेखीखाली प्रत्येक मजल्यावर सात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. बाहेरही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे न्यायमंदिर इमारतीमध्ये किंवा आवारात येणारी प्रत्येक व्यक्ती ‘ अंडर सर्व्हिलन्स’ राहणार आहे.