जेपींच्या उपदेशामुळे जीवनाला शिस्त लागली
By Admin | Updated: October 17, 2014 01:02 IST2014-10-17T01:02:42+5:302014-10-17T01:02:42+5:30
एकीकडे जगताना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोट भरलेल्या व्यक्ती अन्न फेकून देतात, श्रम करणाऱ्याला घाम गाळूनही कष्टाचे मोल मिळत नाही, अशा प्रकारच्या जयप्रकाश नारायण यांच्या

जेपींच्या उपदेशामुळे जीवनाला शिस्त लागली
दीपमाला कुबडे : ‘आठवणीतील जेपी’ यावर व्याख्यान
नागपूर : एकीकडे जगताना अन्न मिळत नाही आणि दुसरीकडे पोट भरलेल्या व्यक्ती अन्न फेकून देतात, श्रम करणाऱ्याला घाम गाळूनही कष्टाचे मोल मिळत नाही, अशा प्रकारच्या जयप्रकाश नारायण यांच्या शिबिरातून झालेल्या उपदेशामुळे जीवनाला शिस्त लागली, असे प्रतिपादन जयप्रकाश नारायण यांच्या मानसकन्या प्रा. दीपमाला कुबडे यांनी आज येथे केले.
सर्वोदय आश्रमाच्या वतीने ‘आठवणीतील जेपी’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. दमयंती पांढरीपांडे होत्या. प्रा. दीपमाला कुबडे म्हणाल्या, तरुणवयात अनेक मोठ्या व्यक्तींच्या सहवासाचे भाग्य मला लाभले. १९४२ च्या क्रांतीत जेपींनी भूमिगत राहून हिंदुस्थान ढवळून टाकला. ते स्वभावाने प्रेमळ होते. दुष्काळी परिस्थितीत त्यांच्यासोबत कपडे गोळा करून ते गरिबांना वाटले. त्यांच्या विचारांचा, कार्याचा प्रभाव मनावर झाला आणि मी त्यांची शिष्य झाले. इंदूरच्या शिबिरात त्यांनी श्रमाचे महत्त्व पटवून दिले. गरिबी काय असते हे सांगणारे जेपींचे भाषण कधीच विसरूशकत नाही. त्या शिबिरानंतर माझ्यात आमूलाग्र बदल झाला. त्यानंतर तरुण शांती सेनेशिवाय इतर कुठल्याच उपक्रमात सहभागी झाले नाही. गावोगावी शिबिरे घेण्यास सुरुवात केली. एकदा युवक काँग्रेसचे १५० जण हातात काठ्या घेऊन चालून आले होते. परंतु धैर्याने त्यांचा सामना केला. शिबिरात आम्ही एकमेकांना पुस्तके वाचण्यासाठी देत होतो. जेपींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पदयात्रा काढली आणि २५०० डाकू आत्मसमर्पणास तयार झाले. या कार्यात कुठेही वाईट अनुभव आले नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दमयंती पांढरीपांडे यांनी गांधींच्या स्वराज्याच्या संकल्पनेला जेपींनी आकार दिल्याची माहिती दिली. संचालन डॉ. नलिनी निसळ यांनी केले. (प्रतिनिधी)