दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर परतला आनंद

By Admin | Updated: July 2, 2015 03:20 IST2015-07-02T03:20:29+5:302015-07-02T03:20:29+5:30

शहर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे उपराजधानीतील दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा एकदा परत आला आहे.

The joy of returning to the face of two families | दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर परतला आनंद

दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर परतला आनंद

‘आॅपरेशन मुस्कान’चा पहिला दिवस
नागपूर : शहर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे उपराजधानीतील दोन कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद पुन्हा एकदा परत आला आहे. पोलिसांनी ‘आॅपरेशन मुस्कान’ अंतर्गत बेपत्ता झालेल्या दोन मुलींसह चार अल्पवयीन मुलांना शोधून काढले आहे. तसेच १९ अल्पवयीनांची माहिती एकत्र केली आहे. शहर पोलिसांतर्फे १ ते ३१ जुलै दरम्यान ‘आॅपरेशन मुस्कान’ राबविले जात आहे. या दरम्यान गेल्या तीन वर्षात शहरातून बेपत्ता झालेल्या २८५ अल्पवयीनांना शोधून काढण्यात येणार आहे.
जरीपटका येथील एक तरुणी २४ जून रोजी घरून अचानक बेपत्ता होऊन अमरावतीला पोहोचली होती. पोलिसांनी या तरुणीला शोधून काढले आहे. त्याचप्रकारे एक दुसरी तरुणीसुद्धा २० जून रोजी आपल्या मैत्रिणीसोबत वर्धेला गेली होती. ती वर्धेत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वर्धेत पोलिसांची चमू पाठविली. तेथून तरुणीला आणण्यात आले. दोघींनाही त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. जरीपटका येथील मूकबधिर वसतिगृहातून १८ जून रोजी ६ वर्षाचा मूकबधिर मुलगा अचानक निघून गेला होता. तो नागरिकांना नारा परिसरात फिरतांना आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी त्याला वसतिगृहात पाठविले.
जरीपटका येथील १४ वर्षीय मुलगा सोमवारी कामठी रोडने ड्रॅगन पॅलेस फिरायला गेला होता. परंतु तो परतलाच नाही. तो भटकून कामठीला निघून गेला होता. मात्र तो स्वत:च घरी आला. त्याचप्रकारे एलआयसी चौकात ६, यशवंत स्टेडियम परिसरातील १३ अल्पवयीन मुलांची माहिती घेण्यात आली आहे. या मुलांचे छायाचित्र, त्यांच्या आईवडिलांचे नाव व इतर माहिती घेण्यात आली आहे. संशयास्पद माहिती मिळाल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पोलिसांनी मुलांच्या बेपत्ता होण्यासंबंधीची माहिती हेल्पलाईन क्रमांक ०७१२-२५२०६९९ आणि टोल फ्री क्रमांक १०९८ यावर देण्याचे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The joy of returning to the face of two families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.