पत्रकारांनी संविधानाशी निष्ठा राखून लेखन करावे
By Admin | Updated: April 9, 2017 02:15 IST2017-04-09T02:15:05+5:302017-04-09T02:15:05+5:30
समाजाच्या समस्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र सुरू केले.

पत्रकारांनी संविधानाशी निष्ठा राखून लेखन करावे
गंगाधर पानतावणे यांचे प्रतिपादन : नरेश वाहाणेंचा स्वर्णवर्षीय सत्कार
नागपूर : समाजाच्या समस्या सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र सुरू केले. समाजाच्या उत्थानासाठी वृत्तपत्र हेच एकमेव बौद्धिक शस्त्र असून पत्रकारांनी संविधानाशी निष्ठा राखून लेखन करावे, असे प्रतिपादन अस्मितादर्शकार, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले.
नरेश वाहाणे स्वर्णवर्षीय जन्मदिवस सत्कार समितीच्यावतीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता तसेच रिपब्लिकन मुव्हमेंटचे संपादक नरेश वाहाणे यांचा दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅडिटोरीयम नवीन सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून लॉंग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे, निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, महिला चळवळीच्या नेत्या, छाया खोब्रागडे, राजन वाघमारे, भीमराव वैद्य, सत्कारमूर्ती नरेश वाहाणे आणि त्यांच्या पत्नी प्राची वाहाणे उपस्थित होत्या. पानतावणे म्हणाले, बाबासाहेबांच्या काळापासून आजपर्यंत अनेकांनी समाजासाठी कष्ट उपसले. परंतु त्यांचा इतिहास कुणालाही माहीत नाही. चळवळीतील खरा कार्यकर्ता वणव्यातून चालतो. वाहाणे हे सुद्धा त्यातील एक कार्यकर्ता आहे. त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन गट असा उल्लेख करण्यापेक्षा रिपब्लिकन चळवळ असा उल्लेख करण्याची गरज असल्याचे सांगून आंबेडकरी चळवळ ही राजकीय क्षेत्रापुरतीच नव्हे तर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळ असल्याचे मत व्यक्त केले. ई. झेड. खोब्रागडे म्हणाले, आंबेडकरी चळवळीचा पराभव झाल्याचे म्हणणे चुकीचे असून तो चळवळीचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पराभव आहे.
विद्यमान सरकार दलितांचे हक्क हिरावून घेत असून कार्यकर्त्यांनी त्या दिशेने कार्य करावे. कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी पॉवर असलेल्या नेत्यांच्या सत्काराची संस्कृती असताना वाहाणेंसारख्या सामान्य कार्यकर्त्याचा गौरव झाल्यामुळे इतर कार्यकर्त्यांना बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ताराचंद्र खांडेकर यांनी नरेश वाहाणे हे दुहेरी भूमिका घेणारा कार्यकर्ता नसल्याने तो सर्वांच्या गळ्यातील ताईत असल्याचे सांगितले. सत्काराला उत्तर देताना नरेश वाहाणे म्हणाले, रिपब्लिकन चळवळ विद्यार्थ्यांची हाती गेली पाहिजे. १४ एप्रिल हा जागतिक प्रेरणा दिन म्हणून जाहीर करण्यासाठी प्रत्येकाने शासनाकडे पत्रव्यवहार करावा. पूर्वी ‘लोकमत’च्या साहित्य जत्रा पुरवणीतील आंबेडकरी चळवळीतील लेख वाचण्यासाठी आठवडाभर वाट पाहत होतो. त्यातूनच वृत्तपत्र काढण्याची प्रेरणा मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नरेश वाहाणे यांचा सपत्निक शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. कार्यक्रमात छाया वानखेडे-गजभिये यांनी भीम-बुद्ध गीत सादर केले. प्रास्ताविक राजन वाघमारे यांनी केले. संचालन पल्लवी जीवनतारे यांनी केले. आभार प्रकाश कुंभे यांनी मानले.(प्रतिनिधी)