जोशी बेपत्ता; चौकशीला होणार सुरुवात
By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:38:17+5:302014-06-30T00:38:17+5:30
ठेवीदारांना थापा देऊन कोट्यवधी रुपये गिळंकृत करणाऱ्या देवनगरातील रविराज फायनान्स कंपनीच्या फसवणुकीचे प्रकरण तूर्त जैसे थे आहे. या प्रकरणाची चौकशी सोमवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक

जोशी बेपत्ता; चौकशीला होणार सुरुवात
रविराज फायनान्स फसवणूक प्रकरण
नागपूर : ठेवीदारांना थापा देऊन कोट्यवधी रुपये गिळंकृत करणाऱ्या देवनगरातील रविराज फायनान्स कंपनीच्या फसवणुकीचे प्रकरण तूर्त जैसे थे आहे. या प्रकरणाची चौकशी सोमवारी गुन्हेशाखेच्या आर्थिक सेलकडे सोपविली जाण्याची शक्यता आहे.
रविराज फायनान्स कंपनीचा संचालक राजेश जोशी याने शेकडो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधींची रक्कम गोळा केली. आता तो गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. त्याने नियोजित अवधीत ठेवीदारांना रक्कम परत केली नसल्यामुळे अस्वस्थ गुंतवणूकदारांनी त्याची माहिती काढणे सुरू केले. तेव्हा जोशीने गुंतवणूकदारांच्या रकमेतून जमा केलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावणे सुरू केल्याचे त्यांना कळले.
एवढेच नव्हे तर देवनगरातील (विवेकानंद नगर) कार्यालयाची इमारतही त्याने विक्रीला काढल्याची चर्चा सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली.
जोशीकडून रक्कम परत मिळत नाही, तो नुसता ‘तारीख पे तारीख’ देत असल्याने गुंतवणूकदारांना फसगत झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे पन्नासावर गुंतवणूकदारांनी गुरुवारी सायंकाळी धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
प्रकरण कोट्यवधींच्या फसवणुकीचे असल्याने धंतोलीच्या अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेऊन शनिवारी सायंकाळी ते परिमंडळ चारचे उपायुक्त चंद्रकिशोर मिना यांच्याकडे पाठविले. मिना यांनी पोलीस आयुक्त-सहआयुक्तांकडे हे प्रकरण निर्णयासाठी पाठविले असून, सोमवारी याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)