‘अडकलेला मांजा काढण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:09 IST2021-03-09T04:09:31+5:302021-03-09T04:09:31+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील झाडे, इमारतींचे छप्पर, विद्युत खांब व इतर ...

‘अडकलेला मांजा काढण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा’
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील झाडे, इमारतींचे छप्पर, विद्युत खांब व इतर ठिकाणी अडकलेला नायलॉन मांजा काढण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. या निर्देशानुसार विविध ठिकाणी अडकलेला मांजा काढण्यासंदर्भात मनपाने मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमध्ये शहरातील स्वयंसेवी संस्था तथा नागरिकांनी सहभागी होऊन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाचे उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.प्रदीप दासरवार यांनी केले आहे.
मकरसंक्रांतीच्या पर्वावर मोठ्या प्रमाणात पतंग उडविण्यात येते. मात्र, पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा उपयोगही केला जातो. हा नायलॉन मांजा अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पशुपक्षी आणि नागरिकांनाही त्यामुळे दुखापत होण्याच्या घटना घडत आहेत. त्या दृष्टीने शहरातील ज्या ठिकाणी नायलॉन मांजा अडकलेला आहे, अशा सर्व ठिकाणचा मांजा काढण्याबाबत सहकार्य करण्यात यावे. याबरोबरच मांजा अडकलेल्या ठिकाणची माहिती संबंधित झोन कार्यालयात द्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.