लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या पुढाकारातून राज्यातील कुशल व नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी इस्रायलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकार आणि इस्रायल सरकार यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ या क्षेत्रात काम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल ५ हजार पदांची भरती होणार आहे. हे सर्व रोजगार इस्रायलच्या नॉन वॉर झोन भागांमध्ये असतील. निवड झालेल्या उमेदवारांना १,३१,००० पर्यंत मासिक वेतन मिळू शकते.
इच्छुक उमेदवारांनी www.maharashtrainternational.com या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर येथे संपर्क साधावा असे उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी सांगितले आहे.
असे आहेत पात्रता निकष :-
- घरगुती सहायक सेवांमध्ये कौशल्य आवश्यक
- किमान ९९० तासांचा मान्यताप्राप्त प्रशिक्षण कोर्स (ओजेटी सहित) पूर्ण केलेले प्रमाणपत्र आवश्यक
- मिडवाइफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी किंवा नर्स असिस्टंटमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे
- जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग पोस्ट बीएससी नर्सिंगधारकांना प्राधान्य
- इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान आवश्यक
- वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान
- शासनाकडून सुविधा : महाराष्ट्र शासन उमेदवारांसाठी निवड प्रक्रिया, आरोग्य तपासणी, पासपोर्ट व व्हिसा प्रक्रिया, मेडिकल विमा, तसेच राहण्याची व जेवणाची सोय यासह इस्रायलमधील सुरुवातीच्या काळात आवश्यक सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे.