कोट्यवधींच्या घोटाळ्यात जीवराज पटेलला अटक
By Admin | Updated: September 8, 2015 05:25 IST2015-09-08T05:25:01+5:302015-09-08T05:25:01+5:30
मां उमिया वसाहतीत कापसी ते तरोडी या सरकारी जमिनीच्या सहा एकर पांदणवर अवैध ताबा मिळवून त्यावर प्लॉट

कोट्यवधींच्या घोटाळ्यात जीवराज पटेलला अटक
नागपूर : मां उमिया वसाहतीत कापसी ते तरोडी या सरकारी जमिनीच्या सहा एकर पांदणवर अवैध ताबा मिळवून त्यावर प्लॉट पाडून विक्री करणारे वसाहतीचे अध्यक्ष जीवराज पटेलला कळमना पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री त्याच्या राहत्या घरून अटक केली. न्यायालयाने त्याला मंगळवार, ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी पूर्वी ४२० कलम आणि नंतर सरकारी संपत्तीची अफरातफर केल्याप्रकरणी ४०९ कलमाखाली गुन्हा नोंदविला आहे. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी जीवराज पटेलने न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला होता. स्थायी जामीनाचा अर्ज सत्र न्यायालयात खारीज होताच पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांनी पटेलच्या अटकेचे आदेश दिले होते.
न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर करताच पटेलची प्रकृती बिघडली. त्याने पोलिसांना छातीत दुखत असल्याची तक्रार केली. उपचारासाठी त्याला तात्काळ मेयो रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी पटेलची प्रकृती ठीक असल्याचे सांगून पोलिसांना कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली. शनिवारी पोलिसांनी त्याच्या महालगांव कापसी येथील फॉर्म हाऊससह अन्य ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. पटेलच्या घराला कुलूप लागले होते. जीवराजसह त्याची पत्नी, मुलगा आणि सून शिरडी येथे गेल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. कारवाई टाळण्यासाठी त्याने मुंबईत काही नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी मां उमिया वसाहतीतील कार्यालयासह अन्य नातेवाईकांकडे चौकशी केली होती. अखेर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री पटेलला त्याच्या घरून अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयात सादर केले.
जमिनीचा घोटाळा मोठा असून सरकारी जमिनीवर परवानगीविना प्लॉट पाडून लोकांना विकले आहेत. या प्रकरणाच्या तपासणीसाठी पोलिसांनी सात दिवसांच्या पीसीआरची मागणी केली. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)
जीवराजकडे प्रचंड संपत्ती
काही वर्षांपूर्वी लाकडाचे काम करणाऱ्या जीवराज पटेलने प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. काही संपत्ती त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहे. महालगांव कापसी येथे १२ एकरात फार्म हाऊस आणि कुही-मांढळ येथे जमीन आहे. आसोली गावात ५० एकर आणि छिंदवाडा आणि पांढुर्णा येथे एसईझेडसाठी जमीन घेतली आहे. त्यानंतर छिंदवाडा येथील २५०० एकर जमीन नागपुरातील खाद्यान्न तयार करणाऱ्या नामांकित फर्मला विकली. त्या प्रकरणी कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची माहिती आहे. जीवराजने राईस सॉरटेक्सचा व्यवसाय सुरू केला. कोल्ड स्टोरेजसह काही दिवसांपूर्वी सामायिक सुविधा उभारल्याचे दाखवून त्याने जवळपास १० ते १२ कोटी रुपयांची सबसिडी शासनाकडून उचलल्याची माहिती आहे. फारच कमी वेळात त्याने शासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने अवैधरीत्या एवढा मोठा व्यवसाय उभा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.