झोटिंग समितीला मुदतवाढ मिळणार ?
By Admin | Updated: September 26, 2016 03:04 IST2016-09-26T03:04:35+5:302016-09-26T03:04:35+5:30
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीची तीन महिन्यांची मुदत गेल्या २३ सप्टेंबर रोजी संपली.

झोटिंग समितीला मुदतवाढ मिळणार ?
खडसेंवरील आरोपांची चौकशी बाकीच : १५ दिवसांपूर्वी पाठवले विनंतीपत्र
नागपूर : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीची तीन महिन्यांची मुदत गेल्या २३ सप्टेंबर रोजी संपली. परंतु चौकशीचे काम अजूनही शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर समितीच्यावतीने १५ दिवसांपूर्वी शासनाला पत्र पाठवून चौकशी समितीला आणखी तीन महिने मुदतवाढ मिळावी, अशी विनंती केली आहे. समितीच्या कामकाजाची नियोजित मुदत संपून दोन दिवस लोटले आहेत. परंतु शासनाकडून अजूनही मुदतवाढीसंदर्भात कुठलेही दिशानिर्देश मिळालेले नाहीत. त्यामुळे समिती अजूनही मुदतवाढीच्या प्रतीक्षेत आहे. चौकशीचे काम पुढे सुरू ठेवायचे की नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.
पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील भूखंड खरेदीवरून खडसे यांच्यावर आरोप होते. त्यामुळे त्यांना जूनमध्ये मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी न्या. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नागपूर येथील रविभवनातून या समितीचे चौकशीचे काम सुरू आहे. तीन महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. २३ जून रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानुसार २३ सप्टेंबर रोजी चौकशी समितीची तीन महिन्यांची मुदत पूर्ण झाली.
या तीन महिन्यात चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चौकशी समितीने आतापर्यंत जमीन खरेदी व्यवहारातील कागदपत्रे मागविली आहेत. अजूनपर्यंत व्यक्तीश: चौकशीला सुरुवात झालेली नाही. चौकशी समिती पुणे आणि मुंबईत जाऊन आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कागदपत्रेसुद्धा तपासण्यात आली आहेत. अजूनही काही कागदपत्रे यायची शिल्लक आहे. ते तपासून झाल्यावर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल. चौकशीचे जवळपास ४० टक्के काम झाल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)