नागपुरात जेटचे कार्यालय सुरू, पण उड्डाण बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 11:04 IST2019-04-15T11:01:13+5:302019-04-15T11:04:33+5:30
जेट एअरलाईन्स कंपनी आर्थिक संकटात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेज कंपनीचे कार्यालय सुरू आहे, पण उड्डाणांचे संचालन बंद आहे.

नागपुरात जेटचे कार्यालय सुरू, पण उड्डाण बंद
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जेट एअरलाईन्स कंपनी आर्थिक संकटात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेट एअरवेज कंपनीचे कार्यालय सुरू आहे, पण उड्डाणांचे संचालन बंद आहे.
जेटची नागपुरातून मुंबई, दिल्ली, अलाहाबाद आणि इंदूरसाठी दररोज सात विमाने होती. दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अलाहाबादला सुरू असलेले एकमेव उड्डाण रद्द झाल्यानंतर आता सर्वच उड्डाणाचे संचालन बंद आहे. अलाहाबाद उड्डाण ५ मेपर्यंत रद्द करण्यात आले आहे. कंपनीचे मुंबईला तीन, दिल्लीसाठी दोन आणि अलाहाबाद व इंदूरकरिता एक-एक उड्डाण होते. फेब्रुवारीत मुंबईचे दोन आणि दिल्लीचे दोन उड्डाण ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आले होते. एप्रिलमध्ये सुरू झाल्यानंतर पुन्हा टेक आॅफ झाले नाही. त्यानंतर हळुहळू सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली. यादरम्यान अनेक प्रवासी विमानतळावर पोहोचतात आणि नाराजी व्यक्त करतात. पूर्वी बुकिंग केलेल्यांना रिफंड देण्यात येत आहे तर काहींना दुसºया कंपनीच्या विमानात जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जेटने विदेशातील सर्व उड्डाणेही बंद केली आहेत. गुरुवारी कंपनीच्या विमानांची संख्या १४ वर आली आहे. पूर्वी कंपनीच्या ताफ्यात १२३ विमाने होती. आर्थिक संकटामुळे वैमानिकांचे वेतन देण्यास कंपनी असमर्थ आहे. याशिवाय सोशल मीडियावर तक्रारी येत आहे. उड्डाण नसल्यामुळे कंपनीच्या तोट्यात आणखी वाढ होण्याच्या शक्यतेमुळे नागपूर विमानतळावरील काऊंटर बंद होऊ शकते. उड्डाणे बंद असल्यामुळे कंपनीचे कर्मचारी नाराज आहे. त्यांना रोजगार हिरावण्याची भीती सतावत आहे. त्यानंतरही उड्डाणे पुन्हा सुरू होऊन सर्वकाही ठीक होण्याची त्यांना अपेक्षा आहे.