संरक्षित जंगलात जेसीबीने खोदकाम
By Admin | Updated: June 10, 2014 01:07 IST2014-06-10T01:07:12+5:302014-06-10T01:07:12+5:30
वन विभागाच्या संरक्षित जंगलात विनापरवानगी खुलेआम जेसीबीने अवैध खोदकाम करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. देवलापार वन परिक्षेत्रातील सिल्लारी बीटमध्ये ही घटना घडली आहे.

संरक्षित जंगलात जेसीबीने खोदकाम
वन कायद्याचे खुलेआम उल्लंघन : देवलापार येथील घटना
नागपूर : वन विभागाच्या संरक्षित जंगलात विनापरवानगी खुलेआम जेसीबीने अवैध खोदकाम करण्यात आल्याची घटना पुढे आली आहे. देवलापार वन परिक्षेत्रातील सिल्लारी बीटमध्ये ही घटना घडली आहे. माहिती सूत्रानुसार येथून बीएसएनएलची केबल लाईन टाकली जात आहे. त्यासाठी जबलपूर येथील एका खासगी ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले आहे. मात्र या ठेकेदाराने वन विभागाची कोणतीही परवानगी न घेता, जंगलातून केबल टाकण्यासाठी जेसीबीने खोदकाम केले आहे. स्थानिक वन कर्मचार्यांच्या ही बाब लक्षात येताच, त्यांनी देवलापारचे वन परिक्षेत्र अधिकारी ए. आर. शेख यांना घटनेची माहिती दिली. त्यावर शेख यांनी संबंधित बिटचे वनपाल मुळे यांना खोदकाम थांबवून जेसीबी जप्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुळे यांनी गत २३ मे रोजी जेसीबी जप्त केली. शिवाय संबंधित ठेकेदाराविरुद्ध ४0 हजार रुपयांचा दंड ठोठावून कारवाईचा अहवाल आरएफओ शेख यांच्याकडे सादर केला. यानंतर संपूर्ण प्रकरण नागपूर येथील सहायक वनसंरक्षक के. झेड. राठोड यांच्यापर्यंत पोहोचले. यानंतर राठोड यांनी आरएफओच्या शिफारशीने ठेकेदाराविरुद्ध केवळ पाच हजार रुपयांचा दंड आकारून लगेच जेसीबी मशीन सोडून देण्याचे मौखिक आदेश जारी केले. त्यानुसार रविवारी ती मशीन ठेकेदाराला परत करण्यात आली. शिवाय सोमवारी सकाळी ठेकेदाराने पुन्हा त्या जेसीबीच्या मदतीने शिल्लक राहिलेले काम पूर्ण केल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, येथील जंगलात वाघ व बिबट्यांसह इतर अनेक वन्यप्राण्यांचा अधिवास आहे. त्यामुळे येथे खोदण्यात आलेल्या नालीत एखादा वन्यप्राणी पडून त्याचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती सूत्रानुसार येथे सुमारे दीड किलोमीटर लांब नालीचे खोदकाम केले जाणार आहे. परंतु आता त्यासाठी संबंधित ठेकेदार वरिष्ठ वन अधिकार्यांना हाताशी धरून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.