जयभीमने दुमदुमली दीक्षाभूमी

By Admin | Updated: October 13, 2016 03:52 IST2016-10-13T03:52:43+5:302016-10-13T03:52:43+5:30

हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर उतरत होते,

Jayabhimane Dumduli Dikshitabhoomi | जयभीमने दुमदुमली दीक्षाभूमी

जयभीमने दुमदुमली दीक्षाभूमी

नागपूर : हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरुप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता. जयबुद्ध, जयभीमच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमून गेला होता.
६०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभागासह, मेयो, मेडिकल व मनपाच्या आरोग्य विभागाने २४ तास आपली सेवा दिली. गेल्या तीन दिवसांपासून दीक्षाभूमी अनुयायांनी फुलून गेली होती. मात्र कुठेही गडबड, गोंधळ झालेला नाही. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने अनुयायी आले होते. त्यांची शिस्तबध्दता खरोखरच वाखाणण्यासारखी होती.


पुस्तकांची दालने
ठरली वैशिष्ट्ये
या सोहळ्याच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक जण आयुष्यभर पुरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पुस्तकांची शिदोरी घेऊन जातो. विशेष म्हणजे, केवळ तीन दिवसांत सर्वात जास्त बुद्ध व आंबेडकरी साहित्य विकल्या जाते. यात सर्वात जास्त मागणी असते ती ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाला. या पुस्तकांमधून बाबासाहेबांचे विचार वाचायला मिळतात. त्यांचे विचारच तर आम्हाला बळ देऊन जाते, असे कृतज्ञेचे भाव सर्वांच्याच चेहऱ्यावर असते. या वर्षी विविध पुस्तक प्रकाशन संस्थांनीही आपली दुकाने थाटली होती.
परतताना कुणी
उपाशी राहू नये
दीक्षाभूमीवरून बुधवारी आपआपल्या घरी परतताना कोणी उपाशीपोटी जाऊ नये म्हणून अनेक संस्थांनी भोजनदानाची व्यवस्था केली होती. मायावती सार्वजनिक उपासक उपासिका या संस्थेने १० हजार लोकांना जेवूघातले. लोखंडे कुटुंबांनीही विशेष व्यवस्था केली होती. माताकचेरी येथील माया मेश्राम यांनी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ बसून लोकांना भोजन वितरित केले.

Web Title: Jayabhimane Dumduli Dikshitabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.