जातपडताळणीची कामे ठप्प

By Admin | Updated: April 6, 2016 03:09 IST2016-04-06T03:09:48+5:302016-04-06T03:09:48+5:30

विदर्भातील जातपडताळणीच्या कामावर गेल्या काही दिवसांपासून संकट निर्माण झाले आहे.

Japaddalani works jam | जातपडताळणीची कामे ठप्प

जातपडताळणीची कामे ठप्प

समित्यांना अध्यक्षांची प्रतीक्षा : विद्यार्थ्यांसह निवडणुकीस इच्छुक उमेदवार त्रस्त
नागपूर : विदर्भातील जातपडताळणीच्या कामावर गेल्या काही दिवसांपासून संकट निर्माण झाले आहे. दोन्ही विभागातील जातपडताळणी समित्यांवर अध्यक्षपद रिक्त झाले आहे. अध्यक्षच नसल्याने जातपडताळणीचे संपूर्ण कामकाज खोळंबले आहे. त्यामुळे जातपडताळणी प्रमाणपत्राची वाट बघत असलेल्या विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यु.एल.सी. प्रकरणात तत्कालीन विभागीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष संजयसिंह गौतम यांना प्रशासकीय स्वरूपाची कामे देऊ नये असे निर्देश दिल्यानंतर गौतम यांचा नागपूर विभागीय जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदाचा प्रभार ८ मार्च पासून काढून घेण्यात आला आहे. गौतम यांच्याकडे नागपूरसह चंद्रपूर व अमरावती विभागातील जातपडताळणी समित्यांच्या अध्यक्षपदाचा प्रभार असल्याची माहिती आहे. अध्यक्षच नसल्यामुळे विदर्भातील जातपडताळणीचे सर्व कामकाज ठप्प आहे.
अनुसूचित जाती, विमुक्त व भटक्या जमाती व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील लोकांना जात पडताळणी समितीतर्फे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. नागपूर विभागात जातपडताळणी समिती क्र. १, २ व ३ आहे. समिती क्रमांक १ वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यासाठी आहे. तर समिती क्रमांक ३ ही फक्त नागपूर जिल्ह्यासाठी आहे. समिती क्रमांक २ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासाठी आहे. तसेच अमरावती विभागात दोन जात पडताळणी समिती आहे. संजयसिंग गौतम हे नागपूर विभागीय जातपडताळणी समिती क्रमांक १ व २ चे अध्यक्ष होते. इतर समित्यांना अध्यक्ष नसल्यामुळे त्यांचाही प्रभार गौतम यांच्याकडेच होता. परंतु यु.एल.सी प्रकरणात त्यांच्याकडून प्रशासकीय कामकाज काढून घेण्याचे न्यायालयाने निर्देश दिल्यामुळे या सर्व समिती अध्यक्षापासून वंचित आहे. चंद्रपूर समितीच्या अध्यक्षपदी एक अधिकारी नियुक्त झाले आहे. परंतु त्यांनीसुद्धा सुट्या टाकल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सध्या दहावी, अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे जातपडताळणीचे अर्ज विभागाकडे येत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांना जातीच्या वैधतेचा दाखला निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे. शासकीय नोकऱ्यांमध्ये रुजू होणाऱ्या उमेदवारांनासुद्धा जात वैधतेच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. परंतु समित्यांना अध्यक्षच नसल्याने ही सर्व कामे ठप्प आहे. समितीकडे प्रलंबित प्रकरणांची यादी मोठी असताना, त्यात आणखी वाढ होत आहे. त्याचा विभागातील कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यासह निवडणूक उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. (प्रतिनिधी)

अधिकारी काम करण्यास अनुत्सुक
विभागीय जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी महसूल विभागाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) यांची नियुक्ती करण्यात येते. या पदाला काही गोष्टीत अर्थ नसल्यामुळे अधिकारी या विभागात काम करण्यास फारसे उत्सुक नसतात. नागपूर व अमरावती येथील जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदासाठी शासनाने नियुक्तीचे आदेश काढले. परंतु समितीच्या अध्यक्षपदावर अद्यापही संबंधित अधिकारी रुजू झाले नाही. त्यामुळे समित्यांची रिक्त पदे शासनाने तत्काळ भरावीत व रुजू होत नसलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
-डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

Web Title: Japaddalani works jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.