फौजदार झाले जमादार
By Admin | Updated: December 21, 2014 00:12 IST2014-12-21T00:12:32+5:302014-12-21T00:12:32+5:30
कामाचा व्याप वाढल्याने खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो जमादारांना अवघ्या दोन महिन्यांसाठी प्रत्यक्ष फौजदार बनविण्यात आले होते. मात्र काम संपल्याने

फौजदार झाले जमादार
डिमोशन : पोलीस प्रशासना अजब तुझा न्याय..!
यवतमाळ : कामाचा व्याप वाढल्याने खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो जमादारांना अवघ्या दोन महिन्यांसाठी प्रत्यक्ष फौजदार बनविण्यात आले होते. मात्र काम संपल्याने आता त्यांना पूर्वपदावर जमादार म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. त्यांना आता अशा आणखी नियुक्त्या मिळण्याची (मुदतवाढ) प्रतीक्षा आहे.
राज्य पोलीस दलात खात्यांतर्गत परीक्षा, त्याचे निकष, नियुक्त्या याचा सुरुवातीपासूनच प्रचंड गोंधळ आहे. त्याचा फटका मात्र सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो आहे. फौजदार पदासाठी खात्यांतर्गत परीक्षा घण्यात आली होती. त्यात अनेक उमेदवार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. मात्र आजही त्यांना फौजदार म्हणून नियुक्ती देण्यात आली नाही. कारण नियुक्ती देताना गुणवत्तेऐवजी सेवाज्येष्ठता हे निकष लावले गेले. त्यामुळे काठावर पास झालेल्या आणि सवलतीच्या गुणांनी पास केल्या गेलेल्या जमादारांना फौजदार म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या. तर सेवाज्येष्ठता नसलेले मात्र उत्कृष्ट गुण मिळविणारे जमादार वंचित राहिले. अशा ज्येष्ठतेच्या तोंडावर असलेल्या काही जमादारांना महासंचालकांच्या विशेष आदेशाने विधानसभा निवडणुकीचा व्याप पाहून दोन महिन्यांसाठी फौजदार म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या होत्या.
नियोजित कालावधीत पूर्ण झाल्याने या नियुक्त्या आपसूकच रद्द झाल्या. कालपर्यंत फौजदार म्हणून मिरविणारे अधिकारी आता पुन्हा पूर्वपदावर सहाय्यक फौजदार-जमादार बनले आहेत. पुन्हा केव्हा कायमस्वरूपी किंवा हंगामी नियुक्त्या मिळणार याची त्यांना प्रतीक्षा आहे. कारण सर्वच जिल्ह्यात पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. फौजदारासह अन्य अधिकाऱ्यांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. रोज नवनवीन गुन्हे दाखल होत आहे. या गुन्ह्यांच्या तपासासाठी पुरेसे अधिकारी उपलब्ध नाहीत. त्यानंतरही दोन महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांना मुदतवाढ दिली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कोकण परिक्षेत्रात नियुक्त्यांना मुदतवाढ
राज्यात कोणत्याच आयुक्तालयात किंवा परिक्षेत्रात आणखी दोन महिन्यांसाठी नियुक्त्या दिल्या गेल्या नसल्या तरी कोकण विभाग मात्र त्याला अपवाद ठरला आहे. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक टी.बी. मुरडनर यांनी आपल्या १० डिसेंबर २०१४ च्या आदेशानुसार दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेल्या फौजदारांना एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात या तात्पुरत्या नियुक्त्या देण्यात आल्या. कोकणचे महानिरीक्षक दोन महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्यांना मुदतवाढ देऊ शकतात तर राज्यातील अन्य पोलीस महानिरीक्षक व पोलीस आयुक्त मुदतवाढ का देत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.