जयस्वाल अध्यक्ष तेलगोटे सरचिटणीस
By Admin | Updated: January 25, 2015 00:53 IST2015-01-25T00:53:35+5:302015-01-25T00:53:35+5:30
जिल्हा बार असोसिएशन (डीबीए) च्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी प्रकाश जयस्वाल तर सरचिटणीस म्हणून नितीन तेलगोटे विजयी झाले.

जयस्वाल अध्यक्ष तेलगोटे सरचिटणीस
डीबीए निवडणूक : निकाल जाहीर
नागपूर : जिल्हा बार असोसिएशन (डीबीए) च्या द्विवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी प्रकाश जयस्वाल तर सरचिटणीस म्हणून नितीन तेलगोटे विजयी झाले.
जयस्वाल यांनी ९६७ मते मिळवीत वंदन गडकरी यांचा पराभव केला. त्यांना ८३९ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी झालेल्या निवडणुकीत नितीन तेलगोटे यांनी १४४७ मते मिळवीत त्यांचे प्रतिस्पर्धी श्यामनयन अभ्यंकर यांचा पराभव केला. त्यांना ४६९ मते मिळाली. तेलगोटे यांना मिळालेली मते आजवरच्या सरचिटणीस पदाच्या उमेदवारापेक्षा अधिक आहेत हे विशेष. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रशांत भांडेकर (१३९२) आणि अक्षय समर्थ (१००४) हे निवडून आले. कोषाध्यक्ष म्हणून नचिकेत व्यास हे सर्वाधिक १५३६ मते घेऊन विजयी झाले.
सहसचिवाच्या दोन जागांसाठी नीलेश गायधने (१२०५) आणि श्रीकांत गौळकर (१०५३) हे निवडून आले. ग्रंथालय प्रमुख म्हणून गिरीश खोरगडे हे निवडून आले. त्यांना ९६३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी आशिष भेंडारकर यांना ७३३ मते मिळाली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून नितीन गडपाले (१०९९), परीक्षित मोहिते (१०३०), उज्ज्वल फसाटे (१०२७), संकेत यादव (१०१९), मनोज मेंढे (१००५), श्रीकांत गावंडे (१००३), समीर पराते (९४७), हेमंत कोरडे (९२५) आणि अर्चना गजभिये (८६१) हे निवडून आले.
तब्बल साडेतीन वर्षानंतर ही निवडणूक झाली. त्यामुळे तरुण मतदारांमध्ये अधिक उत्साह होता. प्रकाश जयस्वाल यांच्यासाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आसिफ कुरेशी, सरकारी वकील दीपक कोल्हे, नगरसेवक संजय बालपांडे, सरचिटणीस नितीन तेलगोटे यांच्यासाठी उच्च न्यायालयाचे सरकारी वकील संजय डोईफोडे, राजेश नायक, उदय डबले, अभय जिकार तर उपाध्यक्ष प्रशांत भांडेकर यांच्यासाठी राम अनवाणे, लुबेश मेश्राम, राजेंद्र मेंढे यांनी मोर्चेबांधणी केली होती.
मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. के. बी. आंबिलवाडे यांच्या नेतृत्वात एस. बी. निनावे, प्रदीप मारपकवार, एस. डी. गढिया, पी. के. मिश्रा, अब्दुल बशीर, जी. वाय. मिश्रा, पी. जी. देशपांडे, सय्यद अहमद अली, एम. कलीम, सूर्यकांत जयस्वाल, नफिसा रोशन, अर्चना रामटेके, अनुप डांगोरे, अतुल चांडक, अजमत शाह, एम. एस. कमलाकर, गोपीकिसन सोनी, विशाखा मेश्राम, मनोज जैन, सतीशकुमार सोनी आणि जी. वाय. हाडके या सर्व वकिलांनी ही निवडणूक सूत्रबद्धरीत्या पार पाडली. (प्रतिनिधी)
‘वकील-न्यायाधीशांमधील दुरावा दूर करणार’
गत चार वर्षांपासून ‘बार - बेंच’ अर्थात वकील आणि न्यायाधीशांमध्ये निर्माण झालेला दुरावा दूर करणार, असे मनोगत डीबीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी व्यक्त केले. विजयी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. परिवर्तनाच्या या निवडणुकीत एक हजार नवीन वकिलांची भूमिका महत्त्वाची ठरली. तब्बल चार वर्षानंतर निवडणूक घेण्यात आल्याने मतदारांनी आपला संताप दाखवून दिला. तब्बल चार वर्षे बारमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते, ते आता संपुष्टात येईल. कोणत्या कामांना प्राधान्य देणार यावर बोलताना ते म्हणाले की, आधी एक हजार वकिलांना बसण्याची व्यवस्था केली जाईल. न्यायमंदिरनजीकच्या नाल्यावर स्लॅब टाकून तेथे तीन मजली इमारत उभारली जाईल, या इमारतीत पार्किंग आणि रिक्रिएशनची व्यवस्था राहील. सध्याच्या पार्किंगच्या जागेत केवळ वकिलांचीच वाहने उभाी राहिली पाहिजे, अशील व इतरांसाठी न्यायमंदिराच्या बाहेर व्यवस्था करण्यावर भर राहील, सध्याची न्यायमंदिर इमारतीची अवस्था जर्जर झाली आहे. त्यामुळे ‘एल’ आकाराच्या विस्तारित इमारतीसाठी प्रयत्न केले जाईल. आमचे जास्तीत जास्त वकील न्यायाधीश झाले पाहिजे, असा आमचा प्रयत्न राहील, सध्या पाचशेवर महिला वकील असून त्यांना बसण्यासाठी केवळ एकच खोली आहे. त्या दिशेने प्रयत्न केले जाईल, असेही अॅड. जयस्वाल म्हणाले. नवनिर्वाचित सरचिटणीस अॅड. नितीन तेलगोटे म्हणाले की, न्यायालयाच्या नवीन इमारतीचा प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, या प्रयत्नात आम्हाला नक्कीच यश मिळेल