दोन हजार दिव्यांगांना लावणार जयपूर फूट
By Admin | Updated: October 9, 2016 02:36 IST2016-10-09T02:36:32+5:302016-10-09T02:36:32+5:30
शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन हजार दिव्यांगांना नागपुरात १४ ते २५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित होणाऱ्या ...

दोन हजार दिव्यांगांना लावणार जयपूर फूट
पालकमंत्री बावनकुळे यांची माहिती : १४ ते २५ आॅक्टोबरदरम्यान शिबिर
नागपूर : शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन हजार दिव्यांगांना नागपुरात १४ ते २५ आॅक्टोबरदरम्यान आयोजित होणाऱ्या जयपूर फूट साहित्य साधने वितरण शिबिरात जयपूर फूट लावून देण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन होत असून या शिबिरामुळे अपंगांना नवीन जीवन मिळणार आहे. भगवान महावीर विकलांग सहायता समिती, महानगरपालिका, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त वतीने हे शिबिर होत आहे. या शिबिरात दिव्यांगांना लागणारे सर्व साहित्य नि:शुल्क वितरित करण्यात येणार आहे. पाय नसलेल्यांना जयपूर फूट त्यांच्या पायाचे मोजमाप घेऊन तयार करून देण्यात येतील.
यशवंत स्टेडियम धंतोली येथे होणाऱ्या या शिबिरात नागपूर अस्थिव्यंग, कर्णबधिर अशा प्रवर्गातील अपंग व्यक्तींची नि:शुल्क जयपूर फूट कृत्रिम अवयव, साहित्य साधनांसाठी भगवान महावीर विकलांग साहित्य समिती जयपूर यांच्याद्वारा तपासणी व मोजमाप करण्यात येईल. मोजमापानंतर त्यांना जयपूर फूट, कुबड्या, श्रवणयंत्र आदी लाभार्थ्यांना नि:शुल्क वाटप करण्यात येईल. सकाळी ९ वाजेपासून शिबिर सुरू होईल. शिबिरात राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची व कायद्याची माहिती देणारे स्टॉल, अपंग वित्त व विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती, बस पास सुविधा स्टॉल, अपंगांबद्दल विविध शासन निर्णयांची माहिती येथे उपलब्ध राहील. अपंगांना नेण्या-आणण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सविस्तर आराखडा तयार केला आहे. याशिवाय बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकल वाटपाची योजनाही तयार करण्यात येत आहे. यावेळी आमदार सुधीर पारवे, डॉ. आशिष देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)