जैन विचारधारेच्या माध्यमातून नवीन ऊर्जा मिळते
By Admin | Updated: October 5, 2015 03:15 IST2015-10-05T03:15:06+5:302015-10-05T03:15:06+5:30
देशाच्या विकासात जैन धर्मीयांचे महत्त्वपूर्ण योगदान असून जैन विचारधारा ही सर्वांना नवीन ऊर्जा देते तसेच एकात्मिक भाव निर्माण करते, ....

जैन विचारधारेच्या माध्यमातून नवीन ऊर्जा मिळते
मुख्यमंत्री : श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात पर्यूषण पर्वाचा समारोप
नागपूर : देशाच्या विकासात जैन धर्मीयांचे महत्त्वपूर्ण योगदान असून जैन विचारधारा ही सर्वांना नवीन ऊर्जा देते तसेच एकात्मिक भाव निर्माण करते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.
लक्ष्मीनगर येथील श्री शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराच्या शांतीनाथ सभागृहात पर्यूषण पर्व समारोहानिमित्त सामूहिक क्षमायाचना तसेच समाज भूषण गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक संदीप जोशी, भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर समितीचे अध्यक्ष सुनील परसुले, कार्याध्यक्ष दीपक पनवेलकर, मनीष मेहता, गोपाल बोहरे, प्रेमचंद मिश्रीकोटकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जगाला ऊर्जा व ताकद देण्याचे काम जैन धर्मगुरूंच्या माध्यमातून होत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, अहिंसेच्या माध्यमातून समाजामध्ये एकात्मता भाव निर्माण करताना जैन समाज धार्मिक समारोहाच्या माध्यमातून सर्व जीवसृष्टीला आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश पोहचवण्याचे कार्य करीत आहे. समाजभूषण पुरस्काराच्या माध्यमातून समाजामध्ये जो चांगले काम करतो, अशा व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांच्या कार्याचा आदर्श व प्रेरणा इतरांनाही मिळावी हा संदेश अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो, असेही ते म्हणाले.
भगवान शांतीनाथ दिगंबर जैन समाजातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांसाठी आवश्यक असलेली संपूर्ण मदत देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्री १००८ भगवान शांतीनाथ दिगंबर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दिगंबर जैन मंदिर पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुनील परसुले यांनी स्वागत केले. तसेच ‘दिगंबर जैन मंदिर पश्चिम विभागातर्फे समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या निवासासाठी तसेच बाहेरून आलेल्या रुग्णांना थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात येते. सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे नागपूर सुधार प्रन्यासचा मोकळा भूखंड संस्थेस उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
अरविंद हनवते यांनी संचालन केले. यावेळी उपाध्यक्ष महेंद्र पेंढारे, सरिता जैन, किशोर मुठमारे, पद्माकर पळसखेडकर, विनय जुनोनकर, केवलचंद जैन, हेमंत लेठे, प्रदीप सोनटक्के, अशोक कान्हेड आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)