कारागृह उपमहानिरीक्षक साठे यांनी पदभार सोडला

By Admin | Updated: July 24, 2015 02:34 IST2015-07-24T02:34:57+5:302015-07-24T02:34:57+5:30

कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी नागपूर विभाग कारागृह प्रशासनाचा पदभार सोडल्याने संबंधित विभागात खळबळ उडाली आहे.

Jail Deputy Inspector General Sathe stepped down | कारागृह उपमहानिरीक्षक साठे यांनी पदभार सोडला

कारागृह उपमहानिरीक्षक साठे यांनी पदभार सोडला

देसाई यांच्यावर धुरा?: पदभार सोडल्याने खळबळ
नागपूर : कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी नागपूर विभाग कारागृह प्रशासनाचा पदभार सोडल्याने संबंधित विभागात खळबळ उडाली आहे. याकूब मेमनच्या फाशीच्या अनुषंगाने तुरुंग प्रशासन प्रचंड दडपणात असताना झालेल्या या घडामोडीमुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
३१ मार्च २०१५ च्या पहाटे नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैदी पळून गेल्यामुळे राज्याचे तुरुंग प्रशासन हादरले होते. या कारागृहात चालणाऱ्या गैरप्रकाराचे वाभाडे निघाल्यामुळे राज्य सरकारने येथील ५ तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ जणांना निलंबित केले होते. एकाला बडतर्फही करण्यात आले. त्यानंतर महिनाभराने कारागृहाचे उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांची येथून बदली झाली. त्यांचा प्रभार स्वाती साठे यांच्याकडे सोपविण्यात आला. अधूनमधून त्या नागपूर कारागृहात येऊन येथील कामकाजाचा आढावा घेऊ लागल्या.
दरम्यान, १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा सूत्रधार याकूब मेमन याचा डेथ वॉरंट निघाल्याचे वृत्त प्रकाशित झाले. त्याला नागपूर कारागृहात ३० जुलैला फाशी देणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे नागपूर कारागृहाच्या आत-बाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून, कारागृह अधिकारी प्रचंड दडपणात असल्याचे एकूणच हालचालीवरून जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, बुधवारी सकाळी उपमहानिरीक्षक स्वाती साठे नागपूर मध्यवर्ती कारागृहात आल्या. त्यांनी कारागृहाच्या आतमध्ये भेट देऊन अंतर्गत स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ध्यानीमनी नसताना सायंकाळी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांच्याकडे सोपवला. या अनपेक्षित घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.

कावळा बसावा आणि फांदी तुटावी - स्वाती साठे
यासंबंधाने साठे यांच्याशी लोकमत प्रतिनिधीने संपर्क साधला असता, ‘जेल बे्रक’ नंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे आपण प्रभार स्वीकारला होता. आता स्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे मी पुण्यात राहून नागपूरचा कारभार बघणे, संयुक्तिक नाही. याउलट तेथील व्यक्ती अधिक चांगल्याप्रकारे ती जबाबदारी सांभाळू शकते. त्यामुळे आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणी आपण खूप दिवसांपूर्वीच नोंदवली होती. ती वरिष्ठांकडून मान्य झाली.त्याचमुळे बुधवारी मी योगेश देसाई यांच्याकडे हा पदभार सोपवला, असे त्या म्हणाल्या. याकूबच्या फाशीची जोरदार चर्चा देशभर सुरू असताना ही घडामोड घडली, यामागे काही खास कारण आहे काय, अशी विचारणा केली असता त्या म्हणाल्या, वेगळे असे काहीच नाही. याकूबच्या फाशीचा विषय आणि आपण पदभार सोडणे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. ‘कावळा बसावा आणि फांदी तुटावी’, तसाच हा प्रकार म्हणता येईल.

Web Title: Jail Deputy Inspector General Sathe stepped down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.