जय जय विठोबा रखुमाई...

By Admin | Updated: July 11, 2014 01:23 IST2014-07-11T01:23:50+5:302014-07-11T01:23:50+5:30

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलभक्तीचे वातावरण आहे. उद्या श्री क्षेत्र पंढरपुरात तल्लीनतेने रंगणाऱ्या भाविक वारकऱ्यांच्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या नामसंकीर्तन सोहळ्याच्या आषाढी

Jai Jai Vithoba Rakhumai ... | जय जय विठोबा रखुमाई...

जय जय विठोबा रखुमाई...

आषाढी एकादशीनिमित्त रंगले अभंग : संगीत कला अकादमीचे आयोजन
नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलभक्तीचे वातावरण आहे. उद्या श्री क्षेत्र पंढरपुरात तल्लीनतेने रंगणाऱ्या भाविक वारकऱ्यांच्या श्री विठ्ठल-रखुमाईच्या नामसंकीर्तन सोहळ्याच्या आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला अभंगांचा कार्यक्रम रंगला. संगीत कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने ‘जय जय विठोबा रखुमाई’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात झाला.
संत रचनांच्या या कार्यक्रमाची संकल्पना विनोद वखरे यांची होती. विनोद वखरे, शशांक दंडे, दीपक कुळकर्णी, यशश्री भावे-पाठक, मंजिरी वैद्य या गायकांनी सुस्वरात सादर केलेल्या अभंग रचनांनी आषाढीच्या पूर्वसंध्येला भाविक-रसिकांना भक्तिरसात चिंब केले. गायकांच्या सामूहिक ‘जय जय विठोबा रखुमाई...’ या नाम गजराने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत सोयराबाई, चोखोबा, जनाबाई, गोरा कुंभार, कान्होपात्रा, सेना आदी संतांच्या सहज सोप्या ओघवती शैलीचे अभंग यावेळी सर्वच गायकांनी भावपूर्णतेने सादर केले.
पंढरीच्या चंद्रभागेतीरी फुलणारा भक्तीचा मळा उपस्थितांच्या मनातही यावेळी लाक्षणिक अर्थाने फुलला. मंजिरी वैद्यने संत ज्ञानेश्वरांच्या ‘ओम नमोजी आद्या...’ या अभंगाने कार्यक्रमाला प्रारंभ केला. यावेळी ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा..., पांडुरंग कांती.., घनु वाजे रुणझुण...’ आदी अभंगाने तिने रंगत आणली. यशश्रीने ‘अवचिता परिमळू..., खेळ मांडियेला..., नाम विठोबाचे घ्यावे..., रंगा येई वो...’ या अभंगांनी भक्तिरस निर्माण केला. विनोद वखरे यांनी ‘अबीर गुलाल..., देवा तुझा मी सोनार..., तुझे रूप चित्ती राहो..., जाता पंढरीसी...’ आदी अभंग भावपूर्णतेने सादर केले. शशांक यांच्यासह ‘कानडा राजा पंढरीचा..., नको देवराया...’ आणि भैरवी विठ्ठल विठ्ठल गजरी... रसिकांची दाद घेणाऱ्या होत्या.
गोविंद गडीकर, संदीप गुरमुळे, अरविंद उपाध्ये, मोरेश्वर दहासहस्र, गजानन रानडे, गजेंद्र गभणे यांनी गायकांना विविध वाद्यांवर साथसंगत केली. प्रकाश सएदलाबादकर यांनी निवेदन केले.
याप्रसंगी विदर्भ प्रांत सहसंघचालक राम हरकरे, विठोबा दंतमंजनचे संचालक सुदर्शन शेंडे व कार्तिक शेंडे, ज्येष्ठ पत्रकार ल. त्र्यं. जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Jai Jai Vithoba Rakhumai ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.