जाधव चौकात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
By Admin | Updated: July 10, 2015 02:51 IST2015-07-10T02:51:45+5:302015-07-10T02:51:45+5:30
पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती

जाधव चौकात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
नागपूर : पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकापुढील जाधव चौकात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असून ही गुंडशाही कोण थांबविणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. काही नागरिकांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्र लिहिले आहे. न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यासाठी हे पत्र जनहित याचिका म्हणून स्वीकारले आहे.
जाधव चौकात झोडापे, नितीन, काल्या, प्रदीप, चोपकर, नगराळे व त्यांच्या साथीदारांसह दारू भट्टीवाले, हमाली व पंक्चर दुरुस्ती यासारखे कार्य करणाऱ्यांनी गुंडगिरीद्वारे धाक निर्माण केला आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांची ताकद प्रचंड वाढली आहे. या परिसरातून जाणाऱ्या महिला व तरुणींची छेड काढली जाते. विरोध करणाऱ्यांना मारहाण केली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून जाधव चौकात सर्रास अवैध खासगी वाहतूक सुरू आहे. गोंदिया, पवनी-लाखांदूर, ब्रह्मपुरी-वडसा, आरमोरी-गडचिरोली, अर्जुनी-साकोली, हिंगणघाट, वर्धा, वणी-वरोरा, चंद्रपूर व इतर मार्गावर धावणाऱ्या १८० ते २०० खासगी ट्रॅव्हल्स जाधव चौकातून सुटतात. ट्रॅव्हल्स मालकांनी पोसलेले गुंड २० टक्के कमिशनवर वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांपुढे प्रवाशांचे अवैध बुकिंग करतात. काही गुंडांनी खासगी बस चालकांकडून प्रत्येकी ५० रुपये वसुली करून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. ही रक्कम ते गरजूंना व्याजाने कर्ज देण्यासाठी वापरतात असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात अॅड. हरनीश गढिया यांनी न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)