ईतवारीतील व्यापारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:35+5:302021-04-07T04:09:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे पहिल्याच दिवशी जमावबंदीचा आदेश झुगारून लॉकडाऊनचा विरोध करीत, अनेक व्यापारी मंगळवारी दुपारी ईतवारीत ...

Itwari's merchant street | ईतवारीतील व्यापारी रस्त्यावर

ईतवारीतील व्यापारी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एकीकडे पहिल्याच दिवशी जमावबंदीचा आदेश झुगारून लॉकडाऊनचा विरोध करीत, अनेक व्यापारी मंगळवारी दुपारी ईतवारीत रस्त्यावर उतरले. दुसरीकडे पोलिसांची वर्दळ दिसत नसल्याने शहरातील विविध भागांत रिकामटेकड्यांनी नेहमीप्रमाणे रस्त्यारस्त्यावर गर्दी केली.

शहरात आजपासून लॉकडाऊन घोषित झाल्याने पहिल्याच दिवशी विरोध करीत ईतवारीतील व्यापारी रस्त्यावर उतरले. त्यांनी दुपारी १च्या सुमारास जोरदार घोषणाबाजी केली. तेथे बंदोबस्तावर असलेले तहसीलचे ठाणेदार जयशे भांडारकर यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढण्याचा आणि गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दी जास्तच वाढली. व्यापारी घोषणाबाजी करू लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. ती चिघळण्याचे संकेत मिळाल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त लोहित मतानी ईतवारीत पोहोचले. रेड्डी यांनी व्यापारी नेत्यांशी चर्चा करून त्यांना स्थिती समजावून सांगितली. गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची भीतीही लक्षात आणून दिली. त्यानंतर, गर्दी पांगली अन् परिस्थिती निवळली. दरम्यान, आज अनेक भागांतील रस्त्यावर पोलीस आढळत नसल्यामुळे रिकामटेकड्यांची दिवसभर ठिकठिकाणच्या भागात नेहमीसारखी वर्दळ बघायला मिळत होती. अनेक भागांत तर हुल्लडबाज ट्रिपल सिट फिरत असल्याचेही दिसत होते.

---

आवश्यकता तेथेच पोलीस

तहसील, गांधीबाग, ईतवारीसारखी स्थिती शहरातील इतर भागात नव्हती. बहुतांश भागातील छोटी-मोठी दुकाने बंदच होती. पोलिसांनी यावेळी बंदोबस्ताचे वेगळे नियोजन केले आहे. रखरखत्या उन्हात आवश्यकता नसताना, पोलिसांना उभे करण्याऐवजी आवश्यकता तेथेच पोलीस असे नियोजन करण्यात आले आहे. एसआरपीएसफ, शिघ्र कृती दलाची पथके ठिकठिकाणी सज्ज ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे जेथे कुठे गर्दी अथवा गडबड झाली किंवा कुठे काही वाद झाल्यास, त्या ठिकाणी तातडीने चारही बाजूचे गस्तिपथकाचे पोलीस पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. संतप्त जनता किंवा व्यापाऱ्यांसोबत वाद घालू नये, बळाचा वापर करू नये, त्याऐवजी समंजसपणे परिस्थिती हाताळावी, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहे. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आहे.

----

तहसील ठाण्यात तीन गुन्हे दाखल

दरम्यान, मंगळवारी दुपारी अनेकांनी गर्दी करून कोरोनाचा धोका वाढविण्याची कृती केल्यामुळे तहसील ठाण्यात कलम १८८ (साथ रोग प्रतिबंधक कायदा) अन्वये दोन, तर कलम २८३ (वाहतुकीला अडथळा निर्माण करणे) अन्वये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. गेल्या २४ तासांत शहरातील २,७५२ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून ५ लाख, ७४ हजारांचा दंड (तडजोड शुल्क) वसुलण्यात आला.

---

Web Title: Itwari's merchant street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.