नवतपा तापतोय
By Admin | Updated: May 26, 2017 02:41 IST2017-05-26T02:41:20+5:302017-05-26T02:41:20+5:30
नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला.

नवतपा तापतोय
नागपूर ४५.५ अंशावर : आकाशात ढगांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला. यात नागपुरातील तापमान ४५.५ अंशावर पोहोचले, तर चंद्रपूर ४७ अंशावर खाली आले.
गुरुवारपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. यासोबतच सूर्य आग ओकू लागला आहे. मागील आठवडाभरापासून ४५ अंशाच्या घरात असलेल्या विदर्भातील तापमानाने आता अचानक ४८ अंशाकडे वाटचाल सुरू केली आहे. या उन्हाच्या तीव्र लाटांमध्ये अक्षरश: विदर्भ होरपळून निघत आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून जीवाची लाहीलाही होत आहे.
हवामान खात्याने या नवतपाच्या काळात विदर्भातील तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचावासाठी प्रत्येकाने
काळजी घेण्याची गरज आहे. जाणकारांच्या मते, नवतपाच्या काळात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात अचानक वाढ होते. त्याचा परिणाम गुरुवारी पहिल्याच दिवशी दिसून आला. सकाळपासूनच अंगाला चटके बसत होते. यानंतर दुपारी सूर्य अक्षरश: आग ओकत होता. मात्र सायंकाळी ४.३० वाजतानंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. आकाशात ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा कोसळल्या. यामुळे वाढत्या तापमानाला थोडा ब्रेक लागला होता. त्याचवेळी हवामान खात्याने नवतपाच्या काळात वादळी वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी नवतपाच्या काळात उपराजधानीतील पारा हा ४७ अंशावर तर चंद्रपूर ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. बुधवारी चंद्रपूर येथील तापमानाने ४७.२ अंशावर सर्वोच्च उच्चांक गाठला होता. गुरुवारी मात्र ४७ अंशावर खाली आले आहे. मात्र त्याचचेळी नागपुरातील तापमानात ०.२ अंशाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी नागपुरातील तापमान ४५.३ अंशावर होते.
पावसाची शक्यता
हवामान खात्याने नवतपामधील २५ आणि २६ मे रोजी सर्वाधिक तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी २७ व २८ मे रोजी सायंकाळी वादळाची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच २९ आणि ३१ मे दरम्यान वादळी पाऊससुद्धा होऊ शकतो, असे सांगितले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार यापूर्वी २ जून २००७ रोजी चंद्रपूर शहरातील तापमान तब्बल ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तो आजपर्यंतच्या तापमानातील सर्वोच्च उच्चांक मानला जातो. या वाढत्या तापमानाचा माणसासह पशु-पक्ष्यांना सुद्धा फटका बसत आहे. गुरुवारी नागपूर ४५.५, चंद्रपूर येथे ४७ अंश, अकोला ४५.७, अमरावती ४३.८, बुलढाणा ४२.६, ब्रम्हपुरी ४६.९, गोंदिया ४४.४, वाशिम ४२.०, वर्धा ४५.७ व यवतमाळ येथे ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.