उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्यास लागणार वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:31+5:302021-07-31T04:09:31+5:30
नागपूर : कोरोना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून उद्योजक आणि व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यवसायावर वेळेचे बंधन ...

उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्यास लागणार वेळ
नागपूर : कोरोना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून उद्योजक आणि व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यवसायावर वेळेचे बंधन असल्याने उत्पादनांची मागणी आणि पुरवठ्यात अंतर कायम आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर उद्योग सांभाळले, पण वेगवान होण्यास आणखी काही वेळ लागणार असल्याचे उद्योजकांचे मत आहे.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी म्हणाले, दुसऱ्या लाटेनंतर सध्या बहुतांश उद्योगात पूर्ण क्षमतेने उत्पादन होऊ लागले आहे. नवीन ऑर्डरसुद्धा मिळत आहेत, पण निर्बंधामुळे विविध क्षेत्रात व्यावसायिक घडामोडी प्रभावित झाल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे फायनान्सच्या अडचणी येत आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने भीतीचे वातावरण पसरल्याचा परिणाम औद्योगिक प्रगतीवर होत आहे. अशा स्थितीत भीती कमी झाल्यानंतर उद्योगाला वेग येण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले, सध्या उद्योग नुकसानीतून बाहेर येत आहेत. बुटीबोरीत ३५० पैकी ३०० उद्योगात उत्पादन होऊ लागले आहे. कर्मचारी पूर्ण क्षमतेने परतले आहे. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने उत्पादन होत आहे. नवीन ऑर्डर मिळत आहेत. पण उद्योगांना फायनान्सच्या अडचणी येत आहेत. स्थिती सामान्य होण्यास आणखी वेळ लागणार आहे.