नेहमीच येतो पावसाळा पण...
By Admin | Updated: July 17, 2014 01:03 IST2014-07-17T01:03:08+5:302014-07-17T01:03:08+5:30
दरवर्षी पावसाळा येतो आणि जातो, समस्या मात्र कायमच राहतात. महापालिका पावसाळापूर्व नियोजन करते मात्र प्रत्यक्षात पाऊस पडल्यावर ते कोठेच दिसत नाही. उपराजधानीसारख्या

नेहमीच येतो पावसाळा पण...
अनेक वर्षांपासून साचते पाणी : महापालिकेची पोलखोल
नागपूर : दरवर्षी पावसाळा येतो आणि जातो, समस्या मात्र कायमच राहतात. महापालिका पावसाळापूर्व नियोजन करते मात्र प्रत्यक्षात पाऊस पडल्यावर ते कोठेच दिसत नाही. उपराजधानीसारख्या शहराची ही अवस्था आहे. शहरात काही पूल, काही रस्ते, चौक आणि वस्त्या आहेत की तेथे वर्षानुवर्षे पाणी साचत आले आहे. मात्र तेथे कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत बोंब आहे.
नरेंद्रनगर पुलाचे काय होणार?
पश्चिम व दक्षिण नागपूरला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलामध्ये नरेंद्रनगर पुलाचा समावेश आवर्जून करावा लागेल. मात्र प्रत्येक पावसाळ्यात या पुलाखाली साचणारे पाणी वाहतुकीसाठी अडचणीचे ठरते. थोडा जास्त पाऊस झाला की येथून वाहने काढणेच अवघड होते. पूर्वी हा रस्ता मुख्य वळण मार्ग (रिंग रोड) असल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागत असे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी भुयारी पूल बांधण्यात आला. मात्र तरीही समस्या कायम आहे. पाऊस आल्यावर पुलाखाली पाणी साचले नाही असे होत नाही. यामुळे नागरिकांना पुलापर्यंत आल्यावर यू-टर्न घ्यावा लागतो. साचलेल्या पाण्याची पातळी इतकी मोठी असते की वाहने पूर्णपणे बुडू शकतात. त्यामुळे पाणी ओसरेपर्यंत थांबणे याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक उरत नाही.
पुलालगत असलेला नाला आणि बाजूच्या वस्त्यांमधून वाहत येणारे पाणी हे या पुलाखाली जमा होणाऱ्या पाण्यासाठी प्रमुख कारणे आहेत. लक्ष्मीनगर भागातून हा नाला येतो व पुढे बेसापर्यंत जातो. नाल्याची रुंदी आणि खोली कमी आहे. याशिवाय रस्ता आणि नाला समांतर आहे. पुलाचा भाग खोलगट आहे. त्यामुळे नाल्यातील पाणी थेट पुलाखाली जमा होते. भागातील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सुभाष अपराजित यांच्याशी याबाबत चर्चा केली असता त्यांनी महापालिकेकडून पुलाचे खोलीकरण न करणे हे यासाठी प्रमुख कारण असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून नाल्यातील गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे पाणी वाहून जात नाही. पात्रातही ठिकठिकाणी अडथळे आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह थांबतो व पाणी रस्त्यावर येते. नरेंद्रनगरसह अनेक वस्त्या या भागात आहेत. या भागाचे नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यांच्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे. दरवर्षीची ही समस्या आहे. मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. याचा फटका नागरिकांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि जड वाहनांनाही बसतो.
बोरकुटे ले-आऊट येथील रहिवासी आदित्य जोशी म्हणाले, पावसाळ्यात या मार्गाने जाणे अनेक कारणांनी घातक आहे. जाताना उजव्या बाजूला एक खड्डा आहे जो अनेकांना माहीत नाही. पाऊस आल्यावर खड्डा पाण्याने भरतो. पाऊस जास्तच झाला तर पाणी गुडघ्यापर्यंत पोहोचते. आॅफिसला जाण्याआधी या पुलाखालची काय स्थिती आहे हे आधी तपासावे लागते.
दररोज या मार्गाने ये-जा करणारे अनिल तांबे म्हणाले, या पुलाची उंची हवी तेवढी नाही आहे. अनेकदा पावसाळ्यात ट्रेलर, ट्रक अडकतात त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. मनीषनगरला जाण्यास नरेंद्रनगर येथूनच एक मार्ग आहे. त्यामुळे दररोज या मार्गाने ये-जा करणाऱ्यांना एका दिव्यातून समोरे जावे लागते. नागपूरचे खासदार नितीन गडकरी देशाचे मंत्री आहेत. वाहतूक खाते त्यांच्याकडे असल्याने त्यांनी स्वत:च्या शहरातील या महत्त्वाच्या रस्त्याकडे जिकिरीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आहे
दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलाखाली साचलेल्या पाण्याचे व त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे छायाचित्र प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रकाशित होते. मात्र समस्या कायम आहे. नगरसेवक येतात. आश्वासने देतात. कोणी पुलाचा आराखडा चुकला असे सांगतात तर कोणी महापालिकेला दोष देतात. तात्पुरत्या उपाययोजना करून वेळ मारून नेली जाते. समस्या मात्र कायम राहते.
लोखंडी पूल, कॉटन मार्केट
या पुलाखाली दर पावसाळ्यात साचणारे पाणी ही समस्या सोडवण्यात महापालिकेला अद्याप यश आले नाही. त्यातच आता विजय सिनेमागृहाजवळ भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी आता पाणी साचते. कॉटन मार्केटचा लोखंडी पूल हा इंग्रजकालीन आहे. या भागात महात्मा फुले भाजी बाजार, रेल्वेस्थानक, गणेश टेकडी मंदिर आहे. पहाटेपासूनच या भागात वर्दळ सुरू होते. जुन्या नागपूरला नवीन नागपूरशी जोडणाऱ्या मार्गापैकी हा एक मार्ग असल्याने तेथून ये-जा करणाऱ्या वाहनांची गर्दी अधिक आहे. पुलाच्या बाजूने गेलेली महापालिकेची जलवाहिनी फुटली असल्याने तेथून पाणी कायम वाहत असते. भर उन्हाळ्यातही पुलाखाली ओल असतेच. पावसाळ्यात तर रस्त्यावरचे पाणी येथे साचते. हा पूलही खोलगट भागात आहे. त्यामुळे इतर भागातून वाहत येणारे पाणी तेथे गोळा होता. विशेष म्हणजे पाणी जाण्यास मार्ग नाही त्यामुळे ते साचून राहते.
दुसरीकडून वाहने काढावी असे ठरविले तर शनिमंदिराच्या रस्त्यावरही तशीच स्थिती राहते. नव्याने बांधलेल्या भुयारी मार्गावर तर याही पेक्षा वाईट परिस्थिती आहे. तेथे गुडघाभर किंवा त्याही पेक्षा पाणी साचलेले राहते. अनेक दशकांपासून हा प्रश्न आहे. कोणी रेल्वेला दोष देतो तर कोणी महापालिकेला. पण समस्या मात्र सुटली नाही.
रेल्वे पूल, घाटरोड
जुन्या नागपूरला नवीन नागपूरशी जोडणाऱ्या मार्गापैकी प्रमुख मार्गावर असलेला हा पूल आहे. जास्त पाऊस आला की तेथे तळे साचते आणि वाहतूक बंद पडते. मुख्य बसस्थानकाहून चंद्रपूर, नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस असो वा खाजगी बसेस यासाठी हाच मार्ग आहे. एखादे वाहन पुलाखाली बंद पडले ही दोन्ही बाजूंनी वाहनांची रांग लागते. या मार्गाला पर्यायी रस्ता कॉटन मार्केटकडून आहे. पण त्या मार्गावरील दोन्ही पुलांची स्थिती वेगळी नाही. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात नेहमीच मनस्ताप सहन करावा लागतो. पुलाच्या एका बाजूने नागनदी वाहते. नदीच्या काठावर झोपडपट्टी आहे. तेथील पाणी नाल्यातच येते. नाल्याची खोली कमी आहे.
रस्ता आणि नाला समांतर असल्याने तेथील सर्व पाणी पुलाखाली जमा होते. याशिवाय पुलही खोलगट भागात असल्याने रस्त्यावरील पाणीही तेथेच गोळा होतो. खोलगट भाग असल्याने येथे अपघाताचा धोका संभवतो. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पाऊस आला आणि पाणी साचले तर जावे कसे असा प्रश्न निर्माण होतो. आता पर्यायी मार्ग आहे. पूर्वी तर थांबण्याशिवाय पर्यायच नव्हता. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे हा मार्ग जातो. रस्तेबांधणी आणि पूल बांधकामाच्या क्षेत्रात गडकरींचे नाव मोठे आहे. त्यांनी यावर मार्ग काढावा, अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत. (प्रतिनिधी)