स्टार बसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
By Admin | Updated: November 23, 2015 02:32 IST2015-11-23T02:32:20+5:302015-11-23T02:32:20+5:30
महापालिकेच्या ठरावानुसार स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती व विशेष समितीच्या कामकाजाच्या नियमावलीला...

स्टार बसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
शुक्रवारी सर्वसाधारण सभा : नियमावलीस मान्यता प्रदान करणार
नागपूर : महापालिकेच्या ठरावानुसार स्थायी समिती, परिवहन समिती, प्रभाग समिती व विशेष समितीच्या कामकाजाच्या नियमावलीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव शुक्रवारी २७ नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या निमित्ताने स्टार बसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
शहरातील प्रवासी वाहतुकीचे संचालन करणाऱ्या वंश निमय कंपनीने ८ कोटीचा कर थकविला आहे. मोटर व्हेईकल टॅक्सचे दोन लाख न भरल्याने परिवहन विभागाने हिंगणा डेपोतील आॅपरेटरच्या नादुरुस्त ६२ बसेस जप्त करण्यात आल्या होत्या. प्रवासी कर व पोषण आहार कराची रक्कम न भरल्याने विभागाने मनपाला नोटीस बजावली तर मनपाने बस आॅपरेटरला नोटीस बजावली. परंतु कंपनीने रक्कम भरण्यास नकार दिला होता. यावर थकबाकी न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. परंतु नोटीसवर नोटीस बजावल्यानंतरही कोणत्याही स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली नाही.
२००७ साली महापालिका व मे. वंश इन्फ्रोटेक प्रा. लि. यांच्यात बस चालविण्याबाबतचा करार झाला. शहरात खाजगी आॅपरेटरच्या २३० बसेस धावायला लागल्या. २००९ मध्ये केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत महापालिकेला पुन्हा ३०० बसेस मिळाल्याने शहरातील स्टार बसची संख्या ५३० झाली होती. खासगी आॅपरेटरवर जबाबदारी सोपविल्याने शहरातील नागरिकांचा प्रवास सुखकर होईल. नोकरदार व विद्यार्थ्यांंचा त्रास कमी होईल. अशी अपेक्षा होती. परंतु असे काही घडले नाही. परंतु कंत्राटदारावर कोणत्याही स्वरूपची कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
स्टार बस घोटाळ्याच्या चौक शीसाठी अनिल सोेले यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. योगायोगाने त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर सोले महापौर झाले होते. त्यांच्या कार्यकाळात चौकशी अहवाल सभागृहाला सादर करण्यात आला होता. यात स्टार बसचा कंत्राट रद्द करण्याची शिफारस केली होती. परंतु अद्याप कोणत्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही.
मनपाने मे. वंश इनफोटेक प्रा. लि. यांच्याशी करार केलेला असला तरी शहरातील बस वाहतुकीवर महापालिके चेच नियंत्रण राहील, असे अपक्षित होते. परंतु असे काहीही घडलेले नाही.शासनाकडून मिळालेल्या बसेस अवघ्या तीन-चार वर्षात भंगार झाल्या आहेत. उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यादृष्टीने अपेक्षित असलेला विकास विचारात घेता भविष्यात शहरात वाहतूक कोंडी होण्याची समस्या उभी ठाकणार आहे. यातून मार्ग काढायचाच झाला तर शहर बस वाहतुकीत सुधारणा करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्टार बसच्या कारभारात सुधारणा होण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)