शुभांगी काळमेघ नागपूर : सध्या बाजारात नकली पनीर विक्रीचं प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढले आहे. अनेक ठिकाणी भेसळयुक्त, कृत्रिमरित्या बनवलेलं पनीर विकल्या जाते. ते पनीर अगदी मूळ पनीरसारखं दिसतं, पण त्याचा स्वाद, पोषणमूल्य आणि आरोग्यावर होणारा परिणाम गंभीर असतो. नकली पनीर स्टार्च, सिंथेटिक दूध, रसायने आणि घातक फॅट्सचा वापर करून तयार केलं जातं आणि बाजारात विकल्या सुद्धा जात. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन अक्षम आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ, दिशाभूल करणारे दावे, आणि बनावट उत्पादनांविरोधात FSSAI थेट कारवाई करू शकते. पण FSSAI आता ग्राहकांना ऑनलाईन तक्रार करण्यासाठी ‘Food Safety Connect’ हे अँप देत आहे ज्याद्वारे ग्राहक खोट्या उत्पादनांची तक्रार देऊ शकतात. FSSAI ची कामे ग्राहकांनी करावी तर मग प्रश्न उभा राहतो FSSAI काय करणार?
ग्राहकाला हे कसं कळणार की उत्पादनात खरोखरच सांगितलेले घटक आहेत की नाहीत? एखादा ग्राहक दुकानात उभा असताना तो तर त्याला दिलेली माहिती खरी आहे असंच गृहीत धरणार कारण FSSAI चं पॅकेजिंगवर असलेलं प्रमाणपत्र त्याला ती हमी देईल.
FSSAI चे काम आहे अन्नपदार्थांचे बाजारात पाठ्वण्याआधी स्वतंत्र प्रयोगशाळांमध्ये परीक्षण करणे, उत्पादन प्रक्रियांचे निरीक्षण करणे, आणि खोट्या दाव्यांना बाजारातच थांबवणे. पण त्याऐवजी ते ग्राहकांना बाजारात आलेले पदार्थ थांबवण्यासाठी तक्रारीचा पर्याय देतात. म्हणजे ते केवळ ग्राहकांनी तक्रार केल्यानंतरच कारवाई करणार.
ग्राहकांच्या तक्रारीनंतर, संबंधित अन्न उत्पादकावर कारवाई करण्यासाठी FSSAI त्यांना नोटीस पाठवते. जर त्यांनी केलेल्या दाव्याचे योग्य पुरावे ते देऊ शकले नाहीत, तर त्यांच्यावर दंड, परवाना रद्द, किंवा इतर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
FSSAI ची जबाबदारी फक्त नियम बनवणे आणि तक्रारींची वाट बघणे नाही. तर त्यांना अधिक सक्रिय पद्धतीने उत्पादन तपासणी करणे, प्रयोगशाळा चाचण्या करणे, आणि बाजारातील सर्व अन्नपदार्थांवर कडक नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कारण ग्राहकाने उत्पादन विकत घेतल्यावर ते खोटं ठरल्यास तक्रार करूनही त्यांचे नुकसान व्हायचे ते तर झालेलं असेल, आर्थिक आणि शारीरिक दोन्ही.