‘सिंचन’ चौकशीची तटकरेंना घाई

By Admin | Updated: August 28, 2016 02:06 IST2016-08-28T02:06:59+5:302016-08-28T02:06:59+5:30

आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची सरकारतर्फे चौकशी सुरू आहे.

'Irrigation' inquiries | ‘सिंचन’ चौकशीची तटकरेंना घाई

‘सिंचन’ चौकशीची तटकरेंना घाई

चौकशी लवकर पूर्ण करण्याची मागणी : सरकारची फक्त टिष्ट्वटरवर टिवटिव
नागपूर : आघाडी सरकारच्या काळात झालेल्या विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांची सरकारतर्फे चौकशी सुरू आहे. या चौकशीत आपलेही नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही चौकशी सुरू असून आपण चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. ही चौकशी लवकर पूर्ण व्हावी व सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. तटकरे यांनी चौकशीला गती देण्याची मागणी करून एकप्रकारे सरकारला आव्हानच दिल्याचे मानले जात आहे.
तटकरे यांनी शनिवारी नागपुरात विदर्भातील सर्व जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, प्रभारी यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी राज्यातील युती सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकार फक्त टिष्ट्वटरवर टिवटिव करते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन प्रश्न समजून घेत नाही. सरकारने व्यापाऱ्यांना कोट्यवधींची एलबीटी माफी दिली. मात्र, दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यालाही कर्जमाफी दिली नाही. धान, कापूस आदी पिकांना चांगला भाव दिला नाही.

सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही
नागपूर : सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही, अशी टीका त्यांनी केली. भाजप- शिवसेनेत सुरू असलेल्या धुसफुसीचा परिणाम शासकीय यंत्रणेवर होत आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना ५० टक्के नोकरशाही आमचे ऐकत नाही, असे सांगावे लागत आहे. सत्तेत राहून विरोधकांची भूमिका घेण्याचा शिवसेनेकडून होणारा प्रयत्न ही जनतेची फसवणूक आहे. विरोधकांसह सामान्य नागरिकांची गळचेपी करणाऱ्या प्रस्तावित अंतर्गत सुरक्षा कायद्याला चौफेर विरोध झाल्यामुळेच सरकारने मसुदा परत घेतला. पण असा कायदा आणण्याचा मानस सरकारने का केला, हे आधी स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
विधान परिषदेत काँग्रेसतर्फे राणे आल्यामुळे राष्ट्रवादीचा प्रभाव कमी झालेला नाही. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मी स्वत: व इतरही सहकारी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. आमचा प्रभाव कमी झाला नाही व होणारही नाही. मात्र, राणेंच्या माध्यमातून काँग्रेस आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. या वेळी माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, नागपूर शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, नाागपूर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे, अजय पाटील, रमेश फुले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

आघाडीचे अधिकार स्थानिक नेत्यांना
आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. काँग्रेसने तयारी दर्शविली तर सोबत लढू अन्यथा स्वतंत्र लढण्याचीही तयारी आहे. राष्ट्रवादी सर्वच निवडणुका ‘घड्याळा’वर लढेल. कुठेही स्थानिक पातळीवर शहर आघाडी किंवा विकास आघाडी अशा बॅनरखाली दुसऱ्या चिन्हावर लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता आपल्याला जनता साथ देणार नाही याचा अंदाज आल्यामुळेच सरकारने निवडणूक पद्धधीतच बदल केला आहे. गादी वाचविण्यासाठी आगामी निवडणुकीत नगर परिषदेचा नगराध्यक्ष थेट निवडण्याचा तसेच महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असल्याची टीकाही त्यांनी केली.
विदर्भाबाबत जनभावना पक्षाला मान्य
वेगळ्या विदर्भाबाबत विदर्भातील जनतेच्या ज्या भावना असतील त्या पक्षाला मान्य आहेत. पण तसे काही नसताना सरकारतर्फे वेगळी भूमिका मांडली जात आहे. गोव्यात वेगळ्या राज्यासाठी सार्वमत झाले होते. आता येथे कसा निर्णय घ्यायचा ते सरकारने ठरवावे. एकीकडे सरकारमध्ये एकत्र नांदायचे व बाहेर विदर्भाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करायची, असा भाजप- सेनेचा खेळ सुरू आहे, अशी टीका तटकरे यांनी केली. विदर्भातील जे राष्ट्रवादीचे नेते आपली भूमिका मांडत आहेत, त्यांच्या मतांचा आमचा पक्ष आदर करतो, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: 'Irrigation' inquiries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.