कृषी पंप वितरणात अनियमितता
By Admin | Updated: July 10, 2014 00:56 IST2014-07-10T00:56:16+5:302014-07-10T00:56:16+5:30
कृषी पंपांना वीज कनेक्शन देणे राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरली असताना वीज वितरण कंपनी महावितरणने यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शंका व्यक्त केली आहे.

कृषी पंप वितरणात अनियमितता
महावितरणची शंका : प्रत्येक अर्जाची होणार तपासणी
नागपूर : कृषी पंपांना वीज कनेक्शन देणे राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरली असताना वीज वितरण कंपनी महावितरणने यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची शंका व्यक्त केली आहे. यासोबतच कंपनीने कृषी पंप वितरणाशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेची आपल्या स्तरावर चौकशी सुद्धा सुरू केली आहे.
महावितरण कंपनीनुसार मागील पाच वर्षांमध्ये दहा लाखापेक्षा अधिक कनेक्शन देण्यात आल्यावर सुद्धा १ लाख ६७ हजार अर्ज अजूनही प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. त्यामुळे यात निश्चितच कुठे ना कुठे अनियमितता झालेली आहे. प्रतीक्षा यादी वाढत असल्याचे दाखविण्यासाठीच कंत्राटदारांसह संगनमत करून कृषी पंप कनेक्शनाचे बोगस आकडे तयार केले जात असल्याची महावितरणला शंका आहे. प्राथमिक चौकशीत अनियमिततेची शंका नाकारता येत नाही.
राज्य सरकारवर कृषी पंप कनेक्शन देण्यासाठी मोठा दबाव आहे. विशेषत: विदर्भामध्ये जिथे सरकारवर बॅकलॉग संपवण्याचीही जबाबदारी आहे. माहितीनुसार याच गतीने कृषी पंप कनेक्शनचे वितरण केले तर बॅकलॉग समाप्त व्हायला १०० वर्षे लागतील. राज्यपालांनीसुद्धा सरकारला तातडीने बॅकलॉग दूर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे महावितरणने निर्णय घेतला आहे की, अर्ज करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला कनेक्शन दिले जाईल आणि अर्जावर तात्काळ कारवाई केली जाईल. यानंतरही प्रतीक्षा यादी वाढतच आहे. सध्या राज्यभरात १ लाख ६७ हजार अर्ज या यादीमध्ये आहेत.
महावितरणला या संख्येवर शंका आहे. मागील ५ वर्षात १० लाखापेक्षा अधिक कनेक्शन दिल्यानंतरही इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज शिल्लक कसे काय राहू शकतात, याचीच चौकशी केली जात आहे. मुंबईस्थित मुख्यालयातून पथक पाठविले जात आहे. या पथकाद्वारे प्रतीक्षा यादीतील अर्जाची चौकशी केली जाईल. (प्रतिनिधी)
४३७ अर्जांपैकी ७२ जणांकडे कनेक्शन
विशेष पथकाद्वारे प्राथमिक चौकशीत ४३७ अर्जांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ७२ अर्जदारांकडे कनेक्शन असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे कनेक्शन असूनही प्रतीक्षा यादीमध्ये यांची नावे कशी काय सामील करण्यात आली. त्याप्रमाणे ८० अर्जदारांना कनेक्शन देण्यात आलेले आहे. मात्र एकही बील सादर करण्यात आलेले नाही. कंपनीतर्फे नागपूर परिमंडळमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये प्रतीक्षा यादीतील ३२ अर्जदारांपैकी ३० जणांना कनेक्शन जारी झालेले आहेत. त्याचप्रमाणे नांदेडमध्ये २६ पैकी २६ जणांना, नाशिकमध्ये २५ पैकी १५ जणांना कनेक्शन मिळालेले आहेत.