लायसन्स नसेल तर पालकांना चालान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:36 IST2017-07-21T02:36:25+5:302017-07-21T02:36:25+5:30
सुपुत्रांचा हट्ट पुरवत वडिलांनी घेऊन दिलेल्या भन्नाट वेगांच्या दुचाकींवर कसरती करणे,

लायसन्स नसेल तर पालकांना चालान
सोमवारपासून महाविद्यालयांसमोर धडक तपासणी मोहीम : वाहतूक पोलीस विभागाने केले ‘अलर्ट’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपुत्रांचा हट्ट पुरवत वडिलांनी घेऊन दिलेल्या भन्नाट वेगांच्या दुचाकींवर कसरती करणे, झिकझॅक पद्धतीने, अतिवेगाने वाहन चालविणे अलीकडे अनेकांचे ‘थ्रील’ झाले आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी आता वाहतूक पोलीस विभागाने कंबर कसली आहे. यासाठी थेट शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत जे विद्यार्थी विना लायसन्स, विना हेल्मेट वाहन चालवीत असतील तर त्यांच्या पालकांवर चालान कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पालकांनीच दक्ष होणे आवश्यक आहे.
वाहतूक विभागाने यासंदर्भात शहरातील सर्व महाविद्यालयांना पत्र दिले असून, सोमवारपासून शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरच या तपासणी मोहिमेचा कार्यक्रमच आखला आहे. यासाठी वाहतूक विभागाच्या प्रत्येक युनिटवर जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ही कारवाई केली होती. त्यावेळी शेकडो पालकांवर कारवाई झाली.
गडद रंगाच्या फिल्मवर होणार कारवाई
सर्वाेच्च न्यायालयाने वाहनांच्या काचांना गडद काळी फिल्म लावण्यावर बंदी घातली आहे. गाडीच्या आतील भागात काय आहे, हे स्पष्टपणे दिसण्यासाठी चारचाकी वाहनांच्या समोरील व मागील बाजूची काच ७० टक्के तर दोन्ही बाजूंच्या काचा ५० टक्के पारदर्शक असाव्यात, असा मोटार वाहन कायदा आहे. परंतु या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने यासंदर्भात नुकतेच वृत्त प्रसिद्धही केले. याची दखल घेत वाहतूक विभाग अशा वाहनांवरही कारवाईची मोहीम हाती घेणार आहे.
शिकाऊ परवानाधारकांनीही पाळावेत नियम
शाळा-महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांकडे शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) आहे त्यांनी या संदर्भातील नियम पाळण्याचे आवाहनही वाहतूक विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांनी शिकाऊ परवाना सोबतच बाळगावा, वाहनावर ‘एल’ चिन्ह लावावे, डबलसीट वाहन चालवू नये.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीच मोहीम
नुकतेच शाळा-महाविद्यालयांना सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक विद्यार्थी दुचाकी, कारचा वापर करतात. यात काही १८ वर्षांखालील मुलांचाही समावेश असतो. अशा विद्यार्थ्यांकडून अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेला घेऊनच ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यात शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. यात दोषी आढळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना जबाबदार धरून पुढील कारवाई करण्यात येईल.
-जयेश भांडारकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग