मिहानमधील गुंतवणुकीला ब्रेक
By Admin | Updated: April 28, 2016 02:52 IST2016-04-28T02:52:07+5:302016-04-28T02:52:07+5:30
जागतिक मंदीचा नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. मंदीमुळे प्रकल्प सुरू करणे ..

मिहानमधील गुंतवणुकीला ब्रेक
नऊ कंपन्यांचा जागा परत करण्याचा प्रस्ताव : एमएडीसीचा कंपन्यांना थांबविण्याचा प्रयत्न
नागपूर : जागतिक मंदीचा नागपुरातील मिहान प्रकल्पाच्या गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. मंदीमुळे प्रकल्प सुरू करणे परवडत नसल्याचे कारण पुढे करून मिहानमधील नऊ कंपन्यांनी जागा परत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) अद्याप कुठलाही निर्णय घेतला नसला तरीही एमएडीसीचे अधिकारी या कंपन्यांना थांबविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकीकडे ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली राज्यात गुंतवणूक वाढल्याचा राज्य सरकार दावा करीत आहे, तर दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील मिहान प्रकल्पात ज्यांनी जागा विकत घेतली, त्या कंपन्यांही आता जागा परत करण्याच्या तयारीत आहेत.
२३ कंपन्यांना शो कॉज नोटीस
मिहानमधील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एमएडीसीचे अध्यक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री व मिहान टास्क फोर्सचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सचे सदस्य आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत २७ डिसेंबरला नागपुरात बैठक झाली होती. या बैठकीत कंपन्यांच्या दुर्लक्षितपणावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती. ज्यांनी जागा विकत घेतली, पण उद्योग सुरू न केलेल्या कंपन्यांना शो कॉज नोटीस देण्याची शिफारस करण्यात आली. या निर्णयानुसार एमएडीसीने २३ कंपन्यांना ३ जानेवारी २०१६ ला नोटीस बजावली होती. त्यातील १९ कंपन्यांनी नोटिसीला उत्तर दिले. त्यातील १० कंपन्यांनी सकारात्मक उत्तर दिले तर ९ कंपन्यांनी जागा परत करण्याची तयारी दर्शविली. जागा घेतली त्यावेळी बाजारपेठेची स्थिती वेगळी होती आणि आता तर मंदीचे सावट आहे. अशा स्थितीत उद्योग सुरू करणे तोट्याचे असल्याचे उत्तर ९ कंपन्यांनी दिले. या कंपन्यांना वाढीव मुदत देण्यासंदर्भात लवकरच होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जागा परत करण्याच्या तयारीत कंपन्या
कंपनी जागा
मिलेनियम ड्रावेल १ एकर
राजतरु इन्फोटेक एन्टरटेनमेंट २.५ एकर
पॅरामाऊंट कंडक्टर्स १.७ एकर
ताज सॅट्स एअर कॅटरिंग २.५ एकर
एल अॅण्ड टी इन्फोसिटी५० एकर
गम फार्मा ५ एकर
झिटा सॉफ्टटेक १ एकर
लाईटहाऊस सिस्टीम १ एकर
इन्फॉमेटिक्स सोल्युसन्स१ एकर