मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण
By Admin | Updated: May 20, 2015 02:53 IST2015-05-20T02:53:59+5:302015-05-20T02:53:59+5:30
स्वीडनचे वाणिज्य दूत (मुंबई) फ्रेड्रिका आॅर्नब्रन्ट यांनी मंगळवारी मिहान-सेझला पहिल्यांदा भेट दिली.

मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण
स्वीडनच्या वाणिज्य दूताची मिहानला भेट : सर्वेक्षणात महाराष्ट्र पुढे
नागपूर : स्वीडनचे वाणिज्य दूत (मुंबई) फ्रेड्रिका आॅर्नब्रन्ट यांनी मंगळवारी मिहान-सेझला पहिल्यांदा भेट दिली. पायाभूत सुविधांची प्रशंसा करताना त्यांनी मिहानमध्ये उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याचे मत व्यक्त केले.
फ्रेड्रिका यांच्यासोबत व्यवस्थापक (पीआर) मिताली करमरकर होत्या. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसीचे) मुख्य अभियंते सुभाष चहांदे, एमआयएलचे महाव्यवस्थापक आबीद रुही आणि एमएडीसीचे विपणन व्यवस्थापक अतुल ठाकरे उपस्थित होते.
फ्रेड्रिका म्हणाले, स्वीडिश कंपन्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देतात. जवळपास एक तृतीयांश कंपन्या या राज्यात आहेत. जागेचे अधिग्रहण हे मोठे आव्हान असले तरीही विस्तारीकरणासाठी इच्छुक असलेल्यांना भारतातील कंपन्यांनी नागपुरात गुंतवणूक करावी. अलीकडेच केलेल्या व्यावसायिक सर्वेक्षणात महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण असल्याचे म्हटले आहे. ९० टक्के स्वीडिश कंपन्यांचा भारतात गुंतवणुकीवर विश्वास आहे. स्मार्ट सिटी आणि शहरी विकासाचा भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांना फायदा असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मिहानमध्ये निविदेद्वारे जमिनीची विक्री
संचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहान प्रकल्पात एसईझेडबाहेरील जमिनीची विक्री निविदेद्वारे करीत आहेत. पहिल्या दोन निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा जमिनीच्या विक्रीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. मिहान-एसईझेडमध्ये व्यावसायिक आणि निवासी व्यवस्था व्हावी, या दृष्टीने जमीन विक्रीचा एमएडीसीचा उद्देश आहे. मिहान प्रकल्पात प्रवेश करतानाच उड्डाण पुलाच्या उजव्या बाजूला चार एकरचे तीन प्लॉट पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये विक्रीस काढले. ५ हजार रुपये चौरस मीटर बेस प्राईस रेट आणि एक एफएसआय ठेवून निविदा बोलविण्यात आल्या. निविदा आल्या पण त्या एमएडीसीच्या अपेक्षानुसार नव्हता. त्यामुळे एप्रिलमध्ये याच प्लॉटसाठी पुन्हा निविदा काढण्यात आल्या. तेव्हा बेस प्राईस रेट ६५०० रुपये चौरस मीटर आणि दीड एफएसआय ठेवण्यात आला होता. त्यावेळीही अपेक्षेनुसार कंपन्या आल्या नाहीत. त्यामुळे या जमिनीसाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.