आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येचा तपास कासवगतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:54+5:302021-08-12T04:11:54+5:30
नागपूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येचा तपास कासवगतीने सुरू आहे, असे ...

आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येचा तपास कासवगतीने सुरू
नागपूर : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येचा तपास कासवगतीने सुरू आहे, असे परखड निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नोंदविले. तसेच, केंद्रीय गुन्हे अन्वेषणला (सीबीआय) तपास पूर्ण करण्यासाठी आणखी चार आठवडे वेळ वाढवून दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार तपास अधिकारी जितेंद्र कचारे (पोलीस निरीक्षक, सीबीआय) यांनी बंद लिफाफ्यामध्ये तपासाचा प्रगती अहवाल सादर केला. न्यायालयाने तो तपासल्यानंतर हे निरीक्षण नोंदवून तपासाचा वेग वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर सीबीआयने तपास पूर्ण होण्यासाठी आणखी दोन महिने वेळ लागेल, अशी माहिती दिली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सीबीआयला पुढील तपासाकरिता चार आठवडे वेळ दिला व त्यानंतर पुन्हा प्रगती अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच, वर्तमान प्रगती अहवाल सुरक्षित ठेवण्याचा आदेश न्यायिक व्यवस्थापकांना दिला.
या प्रकरणाचा तपास वेगात पूर्ण होऊन आरोपींना कडक शिक्षा व्हावी याकरिता एकनाथ निमगडे यांचा मुलगा अनुपम निमगडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी आठच्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली होती. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना निमगडे यांची बंदुकीच्या पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वर्धा मार्गावरील साडेपाच एकर जमिनीच्या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. या जमिनीचा वाद दिवाणी न्यायालयात सुरू आहे.