सरकारी दूध डेअरीच्या कारभाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:08 IST2021-07-28T04:08:34+5:302021-07-28T04:08:34+5:30
भिवापूर : तालुक्यातील कारगाव येथे सरकारी दूध डेअरींतर्गत दूध संकलन केले जाते. मात्र डेअरी चालकाकडून दूध खरेदी व विक्रीमध्ये ...

सरकारी दूध डेअरीच्या कारभाराची चौकशी करा
भिवापूर : तालुक्यातील कारगाव येथे सरकारी दूध डेअरींतर्गत दूध संकलन केले जाते. मात्र डेअरी चालकाकडून दूध खरेदी व विक्रीमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे. याबाबत दूध उत्पादकाने ग्रामपंचायतीकडे तक्रार नोंदवित चौकशीची मागणी केली आहे.
सरकारी दूध डेअरींतर्गत कारगावमध्ये दूध संकलनाचे दैनिक कार्य चालते. मात्र दूध संकलनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीकडून दूध उत्पादकांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना शासकीय दराप्रमाणे रक्कम दिली जात नाही. दुधाचे मोजमाप झाल्यानंतर व पेमेंट दिल्यानंतर संबंधित उत्पादकाची रजिस्टरवरती स्वाक्षरी घेतली जात नाही. शिवाय दूध मोजमापनाचे पासिंग आहे का, दूध डेअरीसाठी समिती स्थापन करावी लागते. मात्र अशी समिती येथे अस्तित्वात आहे का, असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. याबाबत दूध उत्पादक जितेंद्र खाटीक यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असून, सदर डेअरीची चौकशी करण्यात यावी. थकीत पेमेंट तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी केली. दरम्यान, मंगळवारी सकाळच्या सुमारास सरपंच माधुरी दडवे, उपसरपंच रमेश खाटीक व ग्रामपंचायत सदस्य दूध डेअरची मौक्का चौकशी करण्यासाठी गेले असता दूध डेअरीचालकाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सीता नान्हे, शालू लुटे, नूतन सुखदेवे, जोत्सना गहूकर, होमेश्वर गायकवाड, ईश्वर खाटीक, मनोज झिंगरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नथ्थू नक्षीने आदी उपस्थित होते.