सीएमच्या बंगल्यावर अनाहूत पाहुणे
By Admin | Updated: November 6, 2014 02:43 IST2014-11-06T02:43:31+5:302014-11-06T02:43:31+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याजवळ घुटमळणाऱ्या दोन अनाहूत पाहुण्यांनी सुरक्षा यंत्रणेची मंगळवारी चांगलीच तारांबळ उडवली.

सीएमच्या बंगल्यावर अनाहूत पाहुणे
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याजवळ घुटमळणाऱ्या दोन अनाहूत पाहुण्यांनी सुरक्षा यंत्रणेची मंगळवारी चांगलीच तारांबळ उडवली. त्यांच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले अन् कसून चौकशी केली. ‘चिंता की कोई बात नही‘ अशी खात्री पटल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नंतर या तरुणांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले.
घटना मंगळवारी सकाळी घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्कामी असल्यामुळे रविवारी रात्रीपासून त्यांच्या धरमपेठेतील बंगल्यावर आणि आजूबाजूच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था होती. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बंगल्यावर येणाऱ्यांची संख्या मोठी होती. मात्र, बंगल्यासमोर आणि बंगल्याच्या आतमध्ये येणाऱ्या प्रत्येकावर पोलिसांची करडी नजर होती.
बंगल्यावर आलेल्या प्रत्येकाचीच भेट घेत मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास टेकडी गणेशाच्या दर्शनाला निघाले. तेथे गणरायांची पूजाअर्चना केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रामगिरी गाठली. येथेही दुपारपर्यंत बैठक, भेटीगाठी सुरूच होत्या.
दरम्यान, मुख्यमंत्री आपल्या निवासस्थानाहून बाहेर गेल्यामुळे गेल्या ४० तासांपासून निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस सुटकेचा नि:श्वास सोडण्याच्या मुद्रेत होते. मात्र, गेल्या दीड दोन तासांपासून बंगल्याच्या समोरच्या भागात घुटमळत असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. त्याने ही बाब अन्य पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यामुळे बंदोबस्तावरील सर्वच पोलीस चमकले. त्यांनी लगेच या दोन तरुणांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत ते असंबंध उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांचा संशय गडद झाला. या दोन्ही तरुणांचे एकूणच वर्तन पोलिसांची अस्वस्थता वाढविणारे ठरले. त्यामुळे या दोघांना सीताबर्डी ठाण्यात आणण्यात आले. ‘आम्ही येथे नोकरी मागण्यासाठी आलो‘ असे सांगणारे हे तरुण ‘सीएम साहेब ओळखीचे आहे, असेही सांगू लागले. ‘साहेब‘ येथे असताना तुम्ही त्यांना का नाही भेटले, असा पोलिसांनी प्रश्न केला असता ‘त्यांना आम्ही कधीही भेटू शकतो‘, असे सांगून या तरुणांनी पोलिसांनाच निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)