चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा छडा
By Admin | Updated: November 20, 2015 03:18 IST2015-11-20T03:18:17+5:302015-11-20T03:18:17+5:30
एका दिवसात १० ते १५ घरफोड्या करून दररोज लाखोंचा ऐवज चोरणारी आंतरराज्यीय टोळी हुडकेश्वर पोलिसांनी पकडली.

चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा छडा
दिल्लीचे दोन चोरटे गजाआड : म्होरक्यासह दोघे फरार
नागपूर : एका दिवसात १० ते १५ घरफोड्या करून दररोज लाखोंचा ऐवज चोरणारी आंतरराज्यीय टोळी हुडकेश्वर पोलिसांनी पकडली. टोळीतील एका महिलेसह दोघांना अटक करून रोख आणि दागिन्यांसह आठ लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. ही टोळी दिल्लीची असून, टोळीच्या म्होरक्यासह दोघे मात्र पळून गेले. त्यांना आम्ही लवकरच जेरबंद करू, असा विश्वास पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
हुडकेश्वरमध्ये अवघ्या दोन दिवसात आठ घरफोड्या झाल्यामुळे पोलीस हैराण झाले होते. या घरफोडीत सहभागी चोरट्यांकडून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरली जात असल्याचे आणि त्यात एक महिलासुद्धा असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यावरून ठाणेदार राजा पवार आणि त्यांचे सहकारी कामी लागले. बुधवारी दुपारी उदयनगर चौकाकडे पांढऱ्या रंगाची स्कॉपिओ (एमएच ३१/ डीव्ही ७४२९) जात होती. त्यात तीन पुरुष आणि एक महिला दिसल्याने पोलिसांनी उदयनगर चौकातील सिग्नलवर स्कॉर्पिओ थांबवली. ते पाहून कारमधील दोघांनी खाली उड्या मारून पळ काढला. एका महिलेसह दोघे मात्र पोलिसांच्या हाती लागले. दोघे पळून गेल्यामुळे संशय अधिक गडद झाला. त्यामुळे या दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. प्रारंभी असंबंद्ध माहिती देणाऱ्या या दोघांनी नंतर मात्र आपली आणि पळून गेलेल्या साथीदारांची नावे सांगून सात घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. अमित दर्यावसिंग पवार (वय २८,रा.जोहरीपूर,सिकंदराबाद,दिल्ली)आणि प्रियंका सहदेवसिंग ठाकूर (वय २७,रा.सुलेमाननगर, अमनविहार, दिल्ली) अशी पकडण्यात आलेल्या तर, इकराम ऊर्फ समीर गनी आणि मोबीन अशी पळून गेलेल्या चोरट्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)