श्रेयस होले
नागपूर : कोरोनामुळे विमानतळाला आर्थिक नुकसान झाले. आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद झाल्यामुळे विमानतळाची केवळ प्रवासी वाहतूकच बंद नसून कार्गोची वाहतूक बंद झाली.
नागपुरातून फळे, भाज्या, औषधी आदी पदार्थांची आखाती देशांमध्ये निर्यात केली जाते. हे पदार्थ नियमित उड्डाणांच्या ‘बेली कार्गो’ने पाठविण्यात येत होते. यातून विमानतळाला कार्गो हाताळण्यासाठी महसूल मिळत होता. मागील वर्षी मार्च ते नोव्हेंबर या काळात ४६० टनांची निर्यात झाल्याची नोंद करण्यात आली होती. या वर्षी केवळ ७८ टन साहित्याचीच निर्यात करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच विमानतळाला यातून मिळणारा महसूल देखील ७० टक्क्यांनी घटला आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रुही यांनी सांगितले की, मागील वर्षी कार्गो हाताळून विमानतळाने ९ लाख ७५ हजाराचा महसुल मिळविला होता. या वर्षी फक्त ३ लाखाचाच महसूल मिळाला आहे. प्रवासी वाहतूक कमी झाल्यामुळे विमानतळाला आधीच नुकसान झाले आहे. दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असताना असे वाटत होते की, दिवाळीनंतर विमानतळाच्या महसुलात वाढ होईल. परंतु दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली. विमानतळावरील उड्डाणांची संख्या कमीच राहिली. प्रवाशांना विमानतळावर आणि प्रवासादरम्यान सुरक्षित वाटावे यासाठी हवी ती खबरदारी घेण्यात येत आहे. तरीसुद्धा प्रवाशांच्या संख्येत हवी तशी वाढ झालेली नाही. प्रवासी वाहतुकीने मिळणारा महसूल कमी झालेला असताना विमानतळाच्या आवश्यक खर्चासाठी लागणारी रक्कम अप्रवासी महसुलातून मिळविण्यासाठी विमानतळ प्रशासन कोणती पावले उचलणार हे पाहण्याची गरज आहे.
.............