आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद
By Admin | Updated: July 17, 2015 03:07 IST2015-07-17T03:07:55+5:302015-07-17T03:07:55+5:30
दिल्लीत बसून इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्यात जरीपटका पोलिसांनी यश मिळवले.

आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद
देशभरातील अनेकांना गंडा : कोट्यवधींची फसवणूक
नागपूर : दिल्लीत बसून इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्यात जरीपटका पोलिसांनी यश मिळवले. लैसराम हेमंतासिंह वय ३०, बिसनपूर, मणिपूर), थाउदम चिंगलेनशना सिंह (वय २२, रा. इम्फाल मणिपूर), नितिन युमनाम सिंह (वय २४, रा. कोटला मुबारकपूर, दिल्ली), नगांगबाम अमरजीतसिंह, संडे माइकल मदूबुईके (वय ३३) आणि केनेथ ओकाका (वय ३७, रा. सफदरजंग, दिल्ली) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत.
सेकंड शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एका वैज्ञानिक महिलेस डॉ. मोहनसिंग नामक लंडनमधील डॉक्टरने लग्नाची मागणी घातली होती. लग्नानंतर त्याने या महिलेला नागपुरात स्थायिक होण्याचीही बतावणी केली होती. महिलेने त्याच्यावर विश्वास टाकला. त्यानंतर ३० जूनला कथित मोहनसिंगने महिलेला फोन करून आपण लंडनहून भारतात यायला निघाल्याचे सांगितले. आपल्याकडे ८ लाख, ५० हजार डॉलर असल्याचीही बतावणी त्याने केली.
दुसऱ्या दिवशी त्याने दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगून कस्टम ड्युटी भरण्यासाठी ३ लाख ९ हजार रुपये भरले, तरच आपली मुक्तता होईल, अशी बतावणी केली. महिलेचा विश्वास बसावा म्हणून अर्चना सिंग नामक एका बोगस महिला कस्टम अधिकाऱ्याशीही त्याने बोलणी करून दिली. त्यावर विश्वास करून महिलेने ३ लाख ९ हजार रुपये जमा केले. यानंतर आरोपीने तिला पुन्हा २७ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे महिलेला संशय आला. तिने दिल्ली विमानतळावर संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पीडित महिलेने जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
ठाणेदार दीपक खोब्रागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हेशाखेच्या सायबर सेलची मदत घेत आरोपींच्या मोबाईल तसेच लॅपटॉपचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तसेच बँक खात्याची माहिती मिळवली. त्यावरून हे आरोपी दिल्लीत बसूनच देशभरातील नागरिकांना गंडवित असल्याचे उघड झाले. त्यामुळे गुन्हेशाखा आणि जरीपटका पोलिसांचे पथक सोमवारी दिल्लीकडे रवाना झाले. बुधवारी उपरोक्त आरोपींना जेरबंद केल्यानंतर गुरुवारी सकाळी हे पथक आरोपींसह नागपुरात पोहचले. (प्रतिनिधी)
२४ पासबुक, ६५ एटीएम कार्ड
या टोळीकडून पोलिसांनी विविध बँकांमधील खात्याची २४ पासबुक आणि ६५ एटीएम कार्ड जप्त केले. ही टोळी विदेशात नोकरी लावण्याची, मोठी लॉटरी लागल्याची बतावणी करून आमिष दाखवते. आॅनलाईन रक्कम भरायला लावून बँकेच्या खात्याची माहिती मिळवते आणि आॅनलाईन रक्कम काढून घेते. अशा प्रकारे या टोळीने देशातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी जरीपटक्याचे ठाणेदार दीपक खोब्रागडे, पीआय बी. पी. सावंत आणि एपीआय के. डी. वाघ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.