चौघांना अटक, ट्रक जप्त : गोंदिया एलसीबीची कारवाई गोंदिया : ट्रकची चोरी करून दुसर्या राज्यात त्याची विल्हेवाट लावणार्या आंतरराज्यीय टोळीला गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळीतील चौघांना रंगेहाथ पकडून बिलासपूर (छत्तीसगड) येथून त्यांनी चोरून आणलेला ट्रक जप्त करण्यात आला. ट्रक चोरीच्या अनेक घटना गोंदिया जिल्ह्यात बर्याच दिवसांपासून घडत आहेत. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) दिले होते. त्या आधारे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी आपल्या पद्धतीने तपासाचे चक्र फिरविले. यात त्यांना ट्रक चोरीच्या कारवायांत आंतरराज्यीय टोळीचा हात असल्याचे व ही टोळी शहरात दाखल होणार असल्याची माहिती खबर्यांकडून मिळाली. त्या आधारे पोलिसांचे पथक दोन दिवस या टोळीच्या मागावर होते. दरम्यान १३ मे रोजी मध्यरात्री आमगाव मार्गावरील बम्लेश्वरी मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक (सीजी 0४/ जे ५१७५) वर या पथकाला संशय आल्याने त्यांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये असलेल्या लोकांना विचारपूस केली. यावेळी ट्रकमध्ये बलदेवसिंग तारासिंग खैरा (५२, रा.टेकानाका, नागपूर), प्रगटसिंग इकबालसिंग जाट (४३,रा. रमदास, पंजाब), परमेंद्र टहेलसिंग जाट (२८,रा. जब्बोवाल, पंजाब), राजगीरसिंग जितसींग जाट (२९, रा.मेहता चौक, पंजाब) हे होते. त्यांना ट्रकचे कागदपत्र मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सदर पथकाने ट्रकची बारकाईने माहिती काढली असता सदर ट्रकचा खरा क्रमांक सीजी १२/ एस ३३२२ असल्याचे त्यांना कळले. या आरोपींनी बिलासपूर येथील बायपास मार्गावर चालकाला मारहाण करून बनावट क्रमांकाची प्लेट चोरून आणल्याचे कळले. याबाबत पोलीस ठाणे कोनी (बिलासपूर) येथे गुन्हा दाखल असल्याने पथकाने १२ लाख रूपये किमतीचा तो ट्रक जप्त केला. तसेच चारही आरोपींना अटक केली. त्यांची विचारपूस सुरू असून आणखीही ट्रक चोरीच्या काही घटना त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वतर्विली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक भांडारकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर, सहायक फौजदार नवखरे, हवालदार शंकर साठवणे, हवालदार अर्जुनी कावळे, संतोष काळे, नायक शिपाई अजय सवालाखे, धनंजय शेंडे, भुवनलाल देशमुख, तुळसीदास लुटे, रेखलाल गौतम, राजकुमार खोटेले, नितीन जाधव, पोलीस शिपाई विजय शेंडे, चालक सयाम यांनी यशस्वी केली. (शहर प्रतिनिधी)
ट्रक चोरांची आंतरराज्यीय टोळी जाळ्यात
By admin | Updated: May 16, 2014 00:06 IST